मुंबई Maharashtra MLC Election Results 2024 : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी (12 जुलै) मतदान झालं. यात 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं चुरस वाढली होती. महायुती आणि महाविकास आघाडीनं आपापल्या उमेदवाराच्या विजयासाठी तयारी केली होती. यानंतर आता मतमोजणी पूर्ण झाली असून, यात महायुतीचे 9 उमेदवार विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीत कॉंग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा विजय झाला आहे. पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, प्रज्ञा सातव, राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे , भावना गवळी, कृपाल तुमाने आणि सदाभाऊ खोत विजयी झाले आहेत.
विधानपरिषदेतील विजयी उमेदवारांची नावं पुढीलप्रमाणे :
महायुती :
- भाजपा - पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे, सदाभाऊ खोत
- शिवसेना - भावना गवळी, कृपाल तुमाने
- राष्ट्रवादी - राजेश विटेकर, शिवाजीरावर गर्जे
महाविकास आघाडी :
- काँग्रेस - प्रज्ञा सातव
- शिवसेना (UBT) - मिलिंद नार्वेकर
उद्धव ठाकरेंची धावाधाव : ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते. नार्वेकरांसाठी उद्धव ठाकरेंनी धावाधाव केल्याचं बघायला मिळालं. गुरुवारी (11 जुलै) उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांचं मार्गदर्शन केलं होतं. यावेळी ठाकरे गटाकडून व्हीप देखील जारी करण्यात आला होता. तसंच मतदान कशाप्रकारे करायचं याचा डेमो देखील यावेळी आमदारांना दाखवण्यात आला होता. काँग्रेस पक्षाकडूनही आमदारांना व्हीप बजावण्यात आला होता.
महायुतीच्या बैठका : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गुरुवारी रात्री उशिरा आपल्या आमदारांसोबत ताज लँड्स हॉटेलमध्ये बैठक घेतली होती. यावेळी शिवसेना शिंदे गटाकडूनही व्हीप बजावण्यात आला होता. तसंच मतदान कसं करावं, याची सर्व माहिती आमदारांना सांगण्यात आली होती. महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येथील असा विश्वास यावेळी भरत गोगावले यांनी व्यक्त केला होता. तर 'द ललित' हॉटेलमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तर 'प्रेसिडेंट' हॉटेलमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपाची बैठक पार पडली होती. या बैठकींमध्येही व्हीप जारी करण्यात आला होता. अखेर महायुतीच्या सर्व नऊ जागा निवडून आल्या आहेत.
हेही वाचा -
- विधान परिषद निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक, 4 आमदारांनी मारली दांडी - MLC ELECTION 2024
- विधान परिषद निवडणुकीसाठी 'हॉटेल डिप्लोमसी'; मतांची फाटाफूट टाळण्यासाठी राजकीय पक्षांची 'धावपळ' - MLC ELECTION 2024
- विधान परिषद निवडणुकीसाठी अपक्ष, छोट्या घटक पक्षांची मागणी वाढली; 'ही' मतं ठरणार किंगमेकर - MLC Election