मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी लोकसभा निवडणूक ही लिटमस टेस्ट ठरणार आहे. कारण दोन्ही नेत्यांनी पक्षांमध्ये बंडखोरी करत पक्षाचे चिन्ह आणि नाव मिळविण्यात यश मिळविलं आहे. मात्र, मतपेटीमधून मिळणारा कौलच त्यांच्या पुढील राजकारणाची दिशा ठरणार आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान आहे. कारण, दोन्ही नेत्यांनी आपल्या पक्षाचे नाव आणि चिन्ह गमाविलं आहे. भारतीय निवडणूक आयोग आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवार गटाकडं राष्ट्रवादीचे चिन्ह आणि नाव दिलं. तर शिंदे गटाकडं शिवसेनेचे नाव आणि चिन्ह दिलं.
वरिष्ठ पत्रकार आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश अकोलकर म्हणाले, " उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना निवडणुकीत प्रभावी कामगिरी दाखवावी लागणार आहे. कारण, त्यांच्या राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण झाला. उद्धव ठाकर गटाला लोकसभेच्या ७ ते ८ जागांवर विजय मिळवावा लागणार आहे. कारण, वर्षभरातच विधानसभा निवडणुका आहेत. भाजपबरोबर युती असताना शिवसेना ठाकरे गटानं लोकसभेच्या अनेक जागा निवडणुका लढविल्या होत्या. सध्या, ठाकरे गटाकडून केवळ २१ जागांवर उमेदवार देण्यात आले आहेत. त्यातील काही जागांवरही काँग्रेसकडून दावा करण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलानुसार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट १० जागांवर निवडणूक लढवित आहे. मात्र, शरद पवारांसमोर बारामती लोकसभा मतदार संघात मोठं आव्हान आहे. कारण त्यांची कन्या आणि तीन वेळा खासदार झालेल्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवित आहेत.
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अकोलकर म्हणाले, जर शरद पवार हे बारामतीत पराभूत झाले तर, त्यांच्यासाठी मोठा पराभव असेल. पवार कुटुंबासाठी अनेक वर्षांपासून बारामती लोकसभा मतदारसंघ सांभाळणाऱ्या अजित पवार यांच्याविरोधात शरद पवार यांची लढाई आहे. ८३ वर्षीय पवार हे त्यांच्या ५० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत कधीच पराभूत झाले नाहीत. तर उद्धव ठाकरे यांनी आजवर कधीही निवडणूक लढविली नाही. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेतून निवडून आले होते. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे कधीही घराबाहेर पडले नाहीत, अशी भाजपाकडून आजवर सातत्यानं टीका केली. मात्र, लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे राज्यभरात दौरे करत आहेत. त्यांच्या सभेला चांगला प्रतिसाददेखील मिळत आहे. सुप्रिया सुळे यांचा विजय सुकर होण्याकरिता शरद पवार हे प्रयत्न करत आहेत. शरद पवार यांनी एकेकाळचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसचे नेते अनंत थोपटे यांची भेट घेतली होती.
महाविकास आघाडीची प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितबरोबरची बोलणी अपयशी ठरल्यानं राज्यात तिरंगी निवडणूक होणार आहे. त्याचा थेट फायदा महायुतीला होईल, अशी शक्यता ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अकोलकर यांनी व्यक्त केली.
एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांनी साठी पार केलेली आहे. या वयात नवीन इनिंग सुरू करणं सोपे नसते. मात्र, त्यांनी केवळ सत्तेसाठी नाही तर प्राप्तिकर, ईडी आणि सीबीआयकडून कारवाई होऊ नये करिता आपाआपले पक्ष फोडले. विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास देण्याकरिता केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे- काँग्रेसचे वरिष्ठ नेते रत्नाकर महाजन
राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली- वरिष्ठ पत्रकार अभय देशपांडे म्हणाले, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना जुन्या मतदारांचा पाठिंबा मिळतोय का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पक्षांचे पदाधिकारी एकनिष्ठ आहेत का, हे समजू शकणार आहे. भाजपामध्येदेखील अस्वस्थता आहे. भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना अजित पवार गट आणि शिंदे गटाच्या उमेदवारांकरिता मनापासून काम करावे लागणार आहे. राजकीय पक्षांमधील फूट ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र, पहिल्यांदाच बंडखोरांनी मूळ पक्ष ताब्यात घेऊन त्यांचा गट हा खरा पक्ष असल्याची मान्यता मिळविली. अब की बार, ४०० पार ही घोषणा भाजपा कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याकरिता आहे. मात्र, हे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता भाजपाला २०१९ प्रमाणे महाराष्ट्रात ४१ जागांवर विजय मिळवावा लागणार आहे. पक्षफुटीबरोबर पक्षांची दुसऱ्या पक्षांबरोबर हातमिळविणी केल्यानं राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.
भाजपालाच अस्तित्वाची भीती- उद्धव ठाकरे यांची निकटवर्तीय आणि माजी पत्रकार हर्ष प्रधान म्हणाले, भाजपासह त्यांच्या नेत्यांच्या अस्तित्वासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. राजकीय पक्षांना दुर्बल करण्याकरिता भाजपाकडून तपास संस्थांचा वापर होतो. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर भ्रष्टाराचाचे आरोप करून त्यांना पक्षात प्रवेश देणयाची भाजपाची कार्यपद्धती आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात कोकणातील चक्रीवादळ आणि कोरोनाचा परिणाम कमी होण्यासााठी उपाययोजना केल्या होत्या. त्या काळात ठाकरे गटाचे राजकीय वजन वाढल्यानं भाजपामध्ये अस्वस्थता होती.". राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते क्लाईड क्रॅस्टो म्हणाले, ही निवडणूक भाजपाच्या अस्तित्वासाठी महत्त्वाची आहे. कारण, त्यांना निवडणुकीत पराभवाची भीती आहे. त्यासाठी ते कुटुंब आणि पक्ष तोडण्याचा प्रयत्न करतात.
हेही वाचा