नवी दिल्ली : हरियाणा विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांविरोधातील नाराजीची लाट थोपविण्यात भाजपाला यश आले. भाजपाला प्रतिकूल वातावरण असतानाही सामाजिक आणि राजकीय समीकरणाबरोबर जातीय समीकरणांचा वापर करत भाजपानं हरियाणा विधानसभा निवडणुकीत विरोधकांना धोबीपछाड दिली. हरियाणातील निवडणुकीच्या हॅट्रिकनंतर आता महाराष्ट्रात एनडीएची (महाराष्ट्रातील महायुतीची) सत्ता आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मोहीम हाती घेतल्याचं पहायला मिळतंय.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं महाराष्ट्रात 60 हजारांहून अधिक बैठका घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्त्यांचा दहा सदस्यांचा गट वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सर्व विधानसभा मतदारसंघात बैठका घेणार आहे.
नेमकी रणनीती काय? : सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांचे गट महाराष्ट्रातील विविध भागात जाऊन व्यापक जनसंपर्क मोहीम राबविणार आहेत. या मोहिमेची सुरुवात सोमवारपासून (21 ऑक्टोबर) झाली आहे. या मोहिमेंतर्गत ठिकठिकाणी बैठका घेऊन भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं महाराष्ट्रात केलेलं कार्य आणि आगामी निवडणुकीत महायुती येणं का आवश्यक आहे? हेही जनतेला सांगितलं जाणार आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नेहमीच चांगला पगडा राहिलाय. तसंच संघाचं मुख्यालयही इथच आहे. त्यामुळं संघाकडून घेतलेल्या मदतीचा भाजपाला मोठा फायदा होऊ शकतो, असे राजकीय विश्लेषकांचं मत आहे.
जनसंपर्कावर भर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं पक्षाला हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून दूर न जाण्याच्या तसंच पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांकडं दुर्लक्ष न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तिकीट वाटपातही जुन्या कार्यकर्त्यांना लक्ष ठेवावं. तसंच विरोधकांच्या नकारात्मक प्रचाराला वरचढ होऊ देऊ नये, असं संघाचं म्हणणं आहे. महाराष्ट्रातील विशेषत: मुंबई आणि विदर्भातील नेत्यांमध्ये ताळमेळ राखला जावा. तसंच, पक्षानं आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना जनतेमध्ये जाऊन जनसंपर्क करण्याच्या सूचना द्याव्यात, अशा सूचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भाजपाला दिल्या आहेत.
हेही वाचा -