कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर विधानसभेतून महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतल्याने महाविकास आघाडी आणि विशेषत: आमदार सतीश पाटील यांच्यासमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे. कोल्हापूरच्या राजघराण्यासाठी लोकसभेची उमेदवारी खेचून आणण्यात आणि कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी राजघरातील सदस्य मधुरिमा राजे छत्रपती यांची उमेदवारी निश्चित करण्यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत केलेल्या कष्टावर अखेर पाणी फिरलं गेलं आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या निवडणुकीत प्रथमच काँग्रेससह राज्यातील महाविकास आघाडीचं चिन्ह नसणार आहे. आता महाविकास आघाडी अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांच्या मागे आपली ताकद उभी करणार की अजून कोणतं धक्कातंत्र वापरणार? याकडे अवघ्या जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.
कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याला राज्यासह देशात मानाचं स्थान आहे. राजकारणापासून अलिप्त असलेल्या या घराण्यात प्रथमतः 2004 च्या विधानसभा निवडणुकीत मालोजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेच्या सुरेश साळुंखे यांचा पराभव करत राजघराण्यात पहिल्यांदाच आमदारकी खेचून आणली. यानंतर 2009 च्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीराजे यांना शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दिली. मात्र, कोल्हापूरचे दिवंगत खासदार सदाशिव मंडलिक यांनी संभाजी राजेंचा पराभव केला. यानंतर संभाजी राजे समाजकारणासह राजकारणात सक्रिय राहिले.
35 मिनिटात झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर बदलले चित्र- नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शर्थीचे प्रयत्न करून महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेनेकडे (उद्धव ठाकरे) असलेली कोल्हापूर लोकसभेची जागा काँग्रेसकडे खेचून आणली. लोकसभेची उमेदवारी कोल्हापूरचे शाहू छत्रपती यांना देण्यासाठी सतेज पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. शाहू छत्रपतींचा प्रचार ते विजयापर्यंत 'सतेज' यंत्रणा कार्यरत होती. इथपर्यंत सर्व ठीक होतं. मात्र, विधानसभा निवडणूक लागल्यानंतर अनपेक्षितरित्या मालोजीराजे यांच्या पत्नी आणि राज्याचे माजी आरोग्यमंत्री दिग्विजय खांविलकर यांच्या कन्या मधुरिमा राजे छत्रपती यांचे नाव समोर आलं. काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी मिळालेल्या राजू लाटकर यांची उमेदवारी रद्द करून मधुरिमा राजे छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, माघारी अर्ज घेण्याच्या अखेरच्या दिवशी शेवटच्या अवघ्या 35 मिनिटात झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर कोल्हापूरच्या राजकारणात भूकंप झाला. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार मधुरिमा राजे छत्रपती यांनी माघार घेतली. त्यामुळे काँग्रेस पक्षाला आता अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांना पाठिंबा देण्याची नामुष्की येणार आहे.
राजेश लाटकर यांचं नाना पटोले यांना पत्र- राष्ट्रीय काँग्रेस पक्षांनी उमेदवारी नाकारल्यानंतर राजेश लाटकर यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. माघारी घेण्याच्या कालावधीत लाटकर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील, असा अंदाज करण्यात येत होता. मात्र, अखेरच्या दिवशी राजेश लाटकर नॉट रिचेबल झाले. तत्पूर्वी कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांनी लाटकर यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, लाटकर यांच्याकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेरच्याक्षणी मधुरिमाराजे छत्रपती या उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्या. त्यांच्यासोबत राजघराण्यातील सदस्य खासदार शाहू छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे दाखल झाले. मधुरिमाराजे यांनी उमदेवारीचा अर्ज माघारी घेतल्यामुळे सतेज पाटील हे संतापल्याचं दिसून आलं. या संपूर्ण नाट्यमय घडामोडीनंतर सायंकाळी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात चिन्ह वाटप करण्यात आले. अपक्ष उमेदवार राजू लाटकर यांना प्रेशर कुकर हे चिन्ह मिळाले. लाटकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहून काँग्रेस पुरस्कृत उमेदवार करण्याची मागणी केली आहे.
सतेज पाटलांवर निवडणुकीची भिस्त- उत्तर विधानसभेच्या उमेदवारीवरून झालेला गदारोळ, अखेरच्या क्षणी अधिकृत उमेदवारांना घेतलेली माघार आणि विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत केलेला प्रवेश यामुळे काँग्रेसह महाविकास आघाडीत मरगळ आली. ही मरगळ दूर करून काँग्रेसला अच्छे दिन आणण्याची भिस्त आमदार सतेज पाटील यांच्यावर आहे. यासोबतच कोल्हापूर दक्षिण, हातकणंगले, शिरोळ आणि करवीर विधानसभेच्या काँग्रेस उमेदवारांना निवडून आणण्याचा आव्हानही आमदार पाटील यांना पेलावे लागणार आहे. सोमवारी उमेदवारीचा अर्ज मागे घेतल्यानंतर आमदार सतेज पाटील यांना कार्यकर्त्यांसमोर बोलताना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळालं. मात्र, विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करण्यात माहीर असलेल्या आमदार पाटील यांना हलक्यात घेण्याची चूक विरोधक करणार नाहीत. या निवडणुकीत काँग्रेससह महाविकास आघाडीचा आता 'कस' लागणार आहे.
हेही वाचा-