मुंबई JP Nadda Meets CM Eknath Shinde : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले आहेत. बुधवारी रात्री त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. याप्रसंगी नड्डा यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाचे राष्ट्रीय संघटक महामंत्री शिवप्रकाश, भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते.
जे पी नड्डा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तासभर चर्चा : दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आलेले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी बुधवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ही भेट महत्त्वाची मानली जातेय. लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतील जागा वाटपाचा तिढा या भेटीत सोडला गेल्याचीही चर्चा आहे. राज्यात 45 आणि मुंबईतील सहाच्या सहा जागा जिंकण्याचा निर्धार भाजपा महायुतीनं केला आहे. त्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे अशा परिस्थितीत राज ठाकरे यांच्या मनसेला सोबत घेतल्यास त्याचा काय परिणाम होऊ शकतो, या विषयावरही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्याचबरोबर अपवादात्मक परिस्थितीत महायुतीच्या उमेदवारानं कमळ या चिन्हावर निवडणूक लढवावी, असा आग्रह जे पी नड्डा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केल्याचीही चर्चा आहे.
100 दिवस जोमानं कामाला लागा : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे बुधवारपासून दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महाराष्ट्रासह मुंबईतील लोकसभा मतदार संघांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी दिवसभर त्यांनी मुंबईत भाजपा कार्यालयात बैठकांचं सत्र घेतलं. त्यानंतर सायंकाळी त्यांनी अंधेरी इथं भाजपा बूथ प्रमुख आणि कार्यकर्ता संमेलनात उपस्थितांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या मागील 10 वर्षाच्या कार्यकाळाचा आढावा घेत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणं फक्त 100 दिवस जोमात कामाला लागण्याचा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला. यानंतर त्यांनी रात्री उशिरा दादर येथील स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर स्मारकास भेट दिली. आज जे पे नड्डा मुंबईत विविध ठिकाणी भेटी देणार असून त्यानंतर दुपारी सायन इथं लाभार्थी संमेलनास हजेरी लावणार आहेत.
हेही वाचा :