मुंबई CM Eknath Shinde on Shivsena Party name and Symbol : मी राज्यात जेव्हा क्रांती केली, उठाव केला त्यानंतर मी भाजपाच्या वरिष्ठांना सांगितलं की, माझं काम केलंय, आता तुम्ही तुमचं काम करा. यानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे मोदी-शाहांनी आपल्या हातात दिलं. त्यामुळं मी त्यांचे आभार मानतो, असं मोठं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सोमवारी ठाण्यातील महायुतीच्या मेळाव्यात बोलताना केलं होतं. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर याचे वेगवेगळे अर्थ आणि त्या अर्थाचे अन्वयार्थ काढले जात असून, यावर विरोधकांनी टीकास्त्र डागलंय. तर दुसरीकडे शिंदेंच्या बाजूनी निकाल देताना निवडणूक आयोग आणि कोर्टाची भूमिका नेमकी काय होती? मग या निवडणूक आयोगानं कशाच्या आधारावर शिंदेंना पक्ष आणि चिन्ह बहाल केलं, कोणत्या निकषाच्या आधारावर निर्णय दिला, असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित केले आहेत.
आता शिंदेंनीच कबूल केलं : दरम्यान, आत्तापर्यंत निवडणूक आयोग हे कसे एकतर्फी निर्णय देत आहे किंवा आपल्या विरोधात काम करत आहे, हे आपण बोलत होतो, ऐकत होतो. मात्र, आता मोदी-शाहांच्या महाशक्तीमुळंच आपणाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं, असं स्वत: मुख्यमंत्रीच कबूल केल्यामुळं निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पडलंय. महाशक्तीच्या जोरावर सत्ताधारी काहीही करु शकतात हे यांनी दाखवून दिलंय, अशी टिका उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर केलीय.
मग कोर्ट, निवडणूक आयोगाची भूमिका काय : एकीकडं मुख्यमंत्री स्वत:चा पक्ष आणि चिन्ह मिळण्यात मोदी-शाहांचा हात होता म्हणत आहेत, त्यांच्यामुळं आपणाला मिळालं असं म्हणत आहेत. मग दीड वर्षापासून कोर्टामध्ये शिवसेना पक्ष कोणाचा? यावर जी सुनावणी सुरु होती ती फक्त दाखवण्यासाठी होती का? की वेळ दवडण्यासाठी होती? निवडणूक आयोगानं पक्षाचं शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदेंच्या शिवसेनेला दिलं. मग निवडणूक आयोगानं हा निर्णय देताना कोणती भूमिका बजावली? किंवा कशाच्या आधारावर हा निर्णय दिला? नियम, निकष काय होते? सत्ताधारी केंद्र सरकारच्या दबावामुळंच शिंदेंच्या शिवसेनेला हे सर्व मिळालं का? अशी सामान्य लोकांच्यामध्ये देखील भावना आहे. निर्णय आधीच ठरला होता तर मग कोर्ट आणि निवडणूक आयोग फक्त दाखवण्यासाठीच होते का? असाही प्रश्न यानिमित्तानं विचारला जातोय.
ते डुबलीकेट शिवसेनेबद्दल बोलत असतील - ठाकरे गट : दुसरीकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या शिवसेनेबद्दल बोलत आहेत ते त्यांच्या सुरत, गुवाहाटी व्हाया गोवा या डुबलीकेट शिवसेनेबद्दल बोलत असतील. आणि हीच डुबलीकेट शिवसेना मोदी-शाहांनी त्यांना मिळवून दिलीय, असा टोला शिवसेना (ठाकरे गटाच्या) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लगावलाय. जी ओरिजनल मूळ शिवसेना 1966 साली प्रबोधनकार ठाकरे आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली होती. महाराष्ट्र धर्मासाठी, मराठी माणसासाठी जी शिवसेना स्थापन केली होती, ती ओरिजनल शिवसेना अजूनही आमच्याकडे आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. एकनाथ शिंदे ज्या शिवसेनेबद्दल बोलत आहेत. ते त्यांच्या डुबलीकेट शिवसेनेबद्दल बोलत असल्याची टीका सुषमा अंधारेंनी केली.
वक्तव्याचा विपर्यास - शिंदे गट : आम्हाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे घटनेच्या आधारावर आणि संविधानाच्या नियमानुसारच मिळालंय. यात मोदी-शाहा किंवा महाशक्तीचा कुठलाही हातभार नाही. लोकशाहीच्या निकषानुसारच निवडणूक आयोगानं, कोर्टानं आणि विधानसभा अध्यक्षांनी आमच्या बाजूनी निकाल दिलाय. मुख्यमंत्र्यांनी दोन भिन्न वक्तव्य केली आहेत. ती एकत्र करुन त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास काढला जात आहे. चुकीचा अर्थ काढला जात आहे, असं शिवसेना (शिंदे गट) मुख्य सहप्रवक्ते राजू वाघमारे यांनी म्हटलंय. तसंच ठाकरे गट आम्हाला घटनाबाह्य सरकार म्हणत आहे. चुकीच्या पद्धतीनं सरकार स्थापन झालं म्हणत आहे. परंतु घटनेच्या निकषात राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय. संविधानानुसारच हे सरकार स्थापन झालंय. मुख्यमंत्री बोलतात एक आणि त्यांचे विरोधक अर्थ काढताहेत दुसरा, अशी सारवासारव राजू वाघमारे यांनी केलीय.
मुख्यमंत्री चुकून खरं बोललेत : निवडणूक आयोगानं जो निर्णय दिला, तो पूर्णतः पक्षपातीपणाचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड केलं, तेव्हापासून त्यांची जी भाषणं आहेत ती आपल्या पाठीशी महाशक्ती आहे. आपणाला कोणताही धोका नाही. आपल्या पाठीमागे केंद्रीय सत्ता आहे असं सातत्यानं म्हणत आहेत. निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडून एकतर्फी निर्णय दिला आहे. तसंच मुख्यमंत्री सोमवारी ठाण्यात बोलण्याच्या ओघात चुकून ते खरं बोलले आहेत. शिवसेना आणि पक्ष चिन्ह, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे निवडणूक आयोगानं जे फुटीर गट आहेत त्यांनाच दिले. हा निकाल अपेक्षितच होता. हे सगळ्यांना माहिती होतं. राज्यातील जनतेला आता कळून चुकलं की जिकडं सत्ता तिकडेच निर्णय. त्यामुळं यात काही विशेष वाटण्याचं कारण नाही. परंतु मोदी-शाहांमुळे किंबहुना महाशक्तीमुळंच आपणाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं. हे मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय ते खरंच असल्याचं राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हटलंय.
हेही वाचा :