मुंबई Prasad Lad on Ambadas Danve : पावसाळी अधिवेशनातील आज पाचवा दिवस आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन करण्यात आलं. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणानंतर सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास करुन घोषणा दिल्या. या विरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली. घाबरले रे घाबरले भाजपावाले घाबरले..., मनुवाद हटाव संविधान बचाव... अशा घोषणा देत महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. राहुल गांधींच्या विरोधात लोकसभेतील भाषणानंतर खोटा नेरेटीव्ह सेट करण्यात आले. त्याला विरोध म्हणून आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत सरकार विरोधात निदर्शने केली. तर विरोधकांच्या आधी सोमवारी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांच्याबद्दल बोलताना शिवीगाळ केली. या प्रकरणावरून आज सत्ताधारी आक्रमक होत त्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केलं. तसेच अंबादास दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी, अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली.
विरोधी पक्षाला शोभत नाही : आज सकाळी सत्ताधारी पक्षातील प्रसाद लाड, गिरीश महाजन, अशीष शेलार आणि गोपीचंद पडळकर आदी आमदारांनी घोषणाबाजी करत विरोधी पक्षाच्या विरोधात आंदोलन केलं. तसेच अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केली. त्यावरुन सत्ताधारी आक्रमक होत त्यांच्या राजीनाम्याची आणि निलंबनाची मागणी केली. जोपर्यंत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन करणार, असं आमदार प्रसाद लाड म्हणाले. तसेच माझ्या दिवंगत आईला उद्देशून दानवे यांनी शिवी दिली आहे. त्याबद्दल त्यांनी माफी मागावी आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर कारवाई करावी, असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. तसेच विरोधी पक्षाला शिवीगाळ करणं शोभत नाही. राजकारणाचा दर्जा एवढा घसरला आहे का? सभागृहात संसदीय भाषेचा उपयोग केला जातो. पण विरोधकांनाही पातळी ओलांडली असल्याची टीका मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकावर केली.
मी शेपूट घालून पळणार नाही : भाजपानं नियम आणि कायदे शिकवण्याची गरज नाही. राहुल गांधी यांच्यासह आणि 150 खासदाराना निलंबित केलं होतं. त्यामुळं भाजपानं आम्हाला नियम आणि कायदे शिकवण्याची गरज नाही, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. तसेच शिवीगाळ प्रकरणावर बोलताना "मला अस वाटतं आहे की, मी एक शिवसैनिक आहे. आणि शिवसैनिकाच्या बाण्यानं मी ते वक्तव्य केलं आहे. मी पळपुटा नाही. मी शेपूट घालून पळणार नाही," असं अंबादास दानवे म्हणाले.
भाजपाला दंगली घडवायच्या आहेत : दरम्यान काल लोकसभेत राहुल गांधी यांच्यावर सत्ताधाऱ्याकडून टीका करण्यात आली. या विरोधात आम्ही विरोधक आक्रमक होतो म्हणून अंबादास दानवे यांचा मुद्दा सत्ताधाऱ्याकडून पुढं केला जात असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केली. तसेच "संसदेचे विषय इथं काढता येत नाही, मग लाड यांनी असं का केलं? हिंदू धर्म कधी हिंसा निर्माण करण्याचं काम करत नाही. राहुलजी बोलत असताना भाजपानं आपण एकमेव हिंदू रक्षक असल्याचा आव आणला. संविधान सहिष्णुतेचं आणि एकत्र आणण्याचं काम करतो. राहुल गांधी भाजपा आणि आरएसएसच्या ठेकेदारीवर बोलले, यामुळं भाजपाला झोंबलं. आम्ही नेरेटीव्ह सेट केलं असं बोंबलत होते. आगामी काळात आपली पोळी भाजण्यासाठी भाजपा हिंदूच्या नावावर दंगली घडू शकतो," असा घणाघात विजय वडट्टीवार यांनी भाजपवर केला.
हेही वाचा
- अपक्ष उमदेवारानं बिघडविलं गणित, नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किशोर दराडे यांचा विजय - MLC Polls 2024
- कोकण पदवीधर निवडणूक 2024 : भाजपाच्या निरंजन डावखरेंची विजयाची 'हॅटट्रीक'; काँग्रेसच्या रमेश कीर यांना धक्का - Maharashtra MLC Polls 2024
- पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी; परळीत मुंडे समर्थकांकडून जल्लोष - Pankaja Munde News