विरार : विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर बहुजन विकास आघाडीनं विरार येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मोठी घोषणा केली. कार्यकर्त्यांनी हितेंद्र ठाकूर यांचं भाषण मधेच थांबवून वसई विधानसभा मतदारसंघातून त्यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करावी असा आग्रह केला.
स्वतःची उमेदवारी केली जाहीर : माझा कार्यकर्ता हीच माझी मोठी ताकद आहे म्हणणाऱ्या ठाकुरांनी असंख्य कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन स्वतःची उमेदवारी जाहीर केली. यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष झाल्याचं दिसून आलं. पालघर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघातून आपण निवडणूक लढवणार असल्याचं यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी जाहीर केलं. मोठ्या संख्येने बहुजन विकास आघाडीचाच विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त करत कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याच्या सूचना केल्या.
राजीव पाटील यांच्या भाजपामध्ये प्रवेश : राजीव पाटील माझ्या संपर्कात, आम्ही सगळे कामाला लागलो आहोत. गेल्या काही दिवसांपासून बहुजन विकास आघाडीमध्ये राजीव पाटील यांच्या भाजपा प्रवेशामुळं अस्वस्थता होती. यावर हितेंद्र ठाकूर काय भाष्य करतात याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. स्वप्न विरोधी पक्षांना पडली होती पण राजीव पाटील हे माझ्या संपर्कात असून आम्ही सगळे कामाला लागलो आहोत असं ठाकुरांनी सांगितलं. राजीव पाटील पूर्वनियोजित कामामुळं बाहेर असल्याचं त्यांनी सांगितलं आणि यावरून राजकारण करू नये असेही ते म्हणाले.
आमची नावं कधीच खोक्यात आली नाही : फुटाफुटीचं राजकारण महाराष्ट्रात सुरु असताना, आमची नावं कधीच खोक्यात आली नाहीत असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. आमचा बहुजन विकास आघाडी हा पक्ष कायमच विकासाचा मुद्दा घेऊनच राजकारणात काम करतो. त्यामुळं आम्ही विकास कामावरच बोलणार असं ठाकुरांनी सांगितलं. मेळाव्यात अनेक ज्येष्ठ नेत्यांसह अनेक कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या, तरुण कार्यकर्ते उपस्थित होते. नायगाव, नालासोपारा आणि आचोळे येथील अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी बहुजन विकास आघाडीत जाहीर प्रवेश केला.
हेही वाचा -