मुंबई Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार असल्यानं, सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यापूर्वीच मात्र, महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीचे घटक पक्ष असलेले प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) आपली वेगळी चूल मांडून तिसऱ्या आघाडीचे (Third Alliance) संकेत देत आहेत. त्यामुळं विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनंतर महायुती आणि आता दोघांना पर्याय म्हणून तिसरी आघाडी निर्माण होईल का? याविषयी तर्क वितर्क लावले जात आहेत.
तिसरी आघाडी नाही तर अकेला बच्चू कडू : आमदार बच्चू कडू विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीला पर्याय म्हणून तिसरी आघाडी उभी करण्याच्या तयारीत आहेत का. याला उत्तर देताना बच्चू कडू म्हणाले, "तिसरी आघाडी वगैरे राहणार नाही. फक्त बच्चुभाऊची आघाडी. हमारे सवाल, हमारे मुद्देपर हम जनता के सामने जाएंगे". मुद्द्यावर बोला काय दिलं आम्हाला अर्थसंकल्पात? दिव्यांगाला, पत्रकारांना शेतकऱ्यांना आणि शेवटच्या माणसाला काय मिळालं, अशा प्रकारचे प्रश्न आणि मुद्दे आमचे राहणार आहेत.
"एकला चलो चा नारा"? : आर्थिक विभागाचे सर्वे समोर आले आहेत. ज्यात 2017 पासून तर आत्तापर्यंत 45 लाख कोटीची लूट या देशात झाली आहे. याला काँग्रेस आणि भाजपा जबाबदार आहे. भाजपा आणि काँग्रेस देशातील जनतेसोबत खेळत असल्याचा घनाघात बच्चू कडू यांनी केलाय. या विरोधात आम्ही विचार करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ आणि युतीसोबत देखील चर्चा करणार आहे. जनतेसाठी ठोस असा निर्णय जर यांनी घेतला नाही तर बच्चुभाऊची आघाडी आणि प्रहार लढेल असं म्हणत, तिसऱ्या आघाडीच्या प्रश्नाला बगल देत कडू यांनी प्रहार संघटनेच्या माध्यमातून "एकला चलोचा नारा" दिला की काय अशी शंका उपस्थित होत आहे. आम्ही तिसरी आघाडी करणार नसल्याचं स्पष्टीकरण बच्चू कडू यांनी दिलंय. फक्त आणि फक्त बच्चू कडू सिंगल आघाडी असं त्यांनी म्हटलंय.
तिसऱ्या आघाडीचे प्रयोग झालेत : कोणत्याही निवडणुकीत अथवा मतदार संघात एकापेक्षा अनेक उमेदवार उभे राहणं हे स्वाभाविक आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांना पर्याय निर्माण करण्याचं काम अनेकवेळा झालं असल्याचं राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनी सांगितलं. 2009 आणि 2014 साली शेकापाचे जयंत पाटील यांची तिसरी आघाडी म्हणजेच डावी आघाडी तयार झाली होती. त्यासाठी त्यांनी निवडणुकीच्या काळात राज्यभर सभा घेतल्या होत्या. मात्र म्हणावं तसं यश त्यांना आलं नव्हतं. 2014, 2019 आणि 2024 ला प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी म्हणून तिसरी आघाडी निर्माण केली. त्यात 2019 साली वंचितमुळं भाजपाला फायदा झाला. तर 2024 साली काही प्रमाणात काँग्रेसला फायदा झाल्याचा पाहायला मिळालं.
मंत्रिपद बहाल केलं नसल्यामुळं राग : बच्चू कडू यांनी घेतलेली भूमिका त्यांच्या दृष्टीनं योग्य आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. तर आता मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत सरकारमध्ये आहेत, मात्र त्यांना मंत्रिपद बहाल केलं नसल्यामुळं त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राग आहे. त्यामुळं बच्चू कडू अशाप्रकारे वेगवेगळे वक्तव्य करताना दिसत आहेत. विदर्भातील काही भागात बच्चू कडू यांची ताकद आहे. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणती भूमिका घेतात आणि त्यात त्यांना किती यश मिळतं हे महत्त्वाचं असणार आहे.
बच्चू कडू यांना शुभेच्छा : शिंदे शिवसेना पक्षाचे आमदार प्रवक्ता संजय शिरसाट म्हणाले की, बच्चू कडू राजकारणी आमदार आहेत. त्यांना काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळं त्यावर भाष्य करायला नको. मात्र, जेव्हा ते निर्णय घेऊन विधानसभा निवडणुकीत उतरतील त्यावेळेस बोलणे योग्य राहील. तिसऱ्या आघाडीचा फायदा नेमका कोणाला होईल यावर शिरसाट म्हणाले की, या जर तरच्या गोष्टी आहेत. निवडणूक येऊ द्या, त्यांना लोकशाही अधिकाराचा वापर करू द्या, त्यांना आमच्याकडून शुभेच्छा आहेत.
निवडणुकीत कोणाला झटका बसणार : राज्यात जेंव्हा जेंव्हा वेगवेगळ्या निवडणुकीच्या काळात सत्ताधारी, विरोधकांना पर्याय देण्यासाठी तिसरा मोर्चा, आघाडी, युती निर्माण होते त्याचा फायदा किंवा फटका सत्ताधारी आणि विरोधकांना बसत असतो. बच्चू कडू यांनी जरी तिसऱ्या आघाडीविषयी स्पष्ट भूमिका मांडली नसली तरी, त्यांच्या बोलण्यातून तिसऱ्या भिडूचे संकेत मिळत आहेत. त्यामुळं तिसऱ्या भिडूच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना कोणाला झटका बसतो हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
हेहा वाचा -