मुंबई Abu Azmi On Reservation : मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटल्याचं पाहायला मिळतंय. यावरच आता समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी भाष्य केलंय. "एकीकडं मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण भेटावं, याकरीता इतक्या वर्षांपासून आम्ही मागणी करूनही आम्हाला आरक्षण दिलं जात नाही. तर दुसरीकडं मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देऊनही त्यांची भूक भागत नसेल तर काय बोलावं?" असा सवालही त्यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले अबू आझमी? : मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण दिल्यानंतरही मनोज जरांगे पाटील हे सगेसोयरे संदर्भात आक्रमक असून त्यांनी सरकारवर हल्लाबोल करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना धमकी वजा इशारा दिला आहे. तर दुसरीकडं मुस्लिम समाजाला सुद्धा नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण द्यावं, ही मागणी मागील अनेक वर्षापासून समाजवादी पक्षातर्फे करण्यात येत आहे. समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी मागील अनेक वर्षांपासून याबाबत सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर बॅनर झळकावले आहेत. यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधत असताना अबू आझमी म्हणाले की, "ज्याप्रकारे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर सरकारनं मेहरबानी केलीय. तशी मेहरबानी सरकार मुस्लिम समाजाबाबत का करत नाही? इतकंच नाही तर मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देऊन सुद्धा जरांगे पाटील हे अजूनही उपोषणावर ठाम असल्यानं अजून सरकारनं त्यासाठी काय करायला हवं?", असंही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस, मनोज जरांगे पाटलांना का मारतील? : पुढं ते म्हणाले की, "मनोज जरांगे पाटील सांगतात की, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यांच्या जीवाला धोका आहे. परंतु, देवेंद्र फडणवीस यांचा स्वभाव आणि त्यांची कारकीर्द पाहिली असता त्यांच्याकडून असं कुठलंही काम होणार नाही. फडणवीस हे मनोज जरांगे पाटलांना का मारतील? विनाकारण काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं." तसंच ओबीसी समाजाचं आरक्षण मागून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न मनोज जरांगे पाटील करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
फक्त मतांसाठी मुसलमान हवा : "जरांगे पाटलांच्या आंदोलनाला सरकारनं झुकत माप दिलं. तशा पद्धतीचं आंदोलन जर मुस्लिमांनी त्यांच्या आरक्षणासाठी छेडलं असतं तर कब्रस्तान भरून गेले असते. सरकारनं आमचं आंदोलन चिरडून टाकलं असतं. लाठीचार्ज झाला असता. तर जेल भरून गेले असते. या सरकारला फक्त मतांसाठी मुस्लिम समुदाय हवा आहे. त्यांच्या मागण्यांकडं ते वारंवार दुर्लक्ष करताय. 'जिसकी लाठी उसकी भैस' याप्रमाणे ज्याचं सरकार त्याची हुकूमत असंच चित्र राज्यात आणि देशात सुरू आहे. या सरकारला कुणाचं काहीही पडलेलं नाही. फक्त राजकारणात आपली पोळी भाजून घ्यायची हेच यांना माहित आहे", असं म्हणत अबू आझमी यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा -
- मुस्लिम आरक्षणासाठी अबू आझमी आक्रमक, मुस्लिमांना शिक्षणासह नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्याची मागणी
- अबू आझमी संगमनेर दौऱ्यावर, ग्रामस्थांचा रोष पाहून पोलिसांनी रोखलं, पाहा व्हिडिओ
- Income Tax Raid On Abu Azmi : अबू आझमींच्या निकटवर्तीयांवर टाकलेल्या छाप्यात सापडलं 'मोठं' घबाड, विनायक ग्रुपची 250 कोटीची मालमत्ता जप्त