हैदराबाद Tips For Teeth Care : हल्ली दातांसंबंधित अनेक समस्या वाढत चालल्या आहेत. लहान मुलांचे दात बरेच लवकर किडत आहेत. यामागील कारण म्हणजे चॉकलेट किंवा गोड पदार्थ खाल्यानंतर मुलं दातांची हवी तशी स्वच्छता करत नाहीत. परिणामी दात किडतात. मोठ्या माणसांबद्दल सागायचं झालं तर बहुतेक तोंडाचे आजार हे दातांच्या अस्वच्छतेमुळे पसरतात. त्यामुळे तोंडाची नियमित स्वच्छता करणे खूप गरजेचे आहे. मात्र, अनेकजण दात घासताना काही चुका करतात. या चुका दात आणि हिरड्यांवर परिणाम करतात.
दातांची स्वच्छता न केल्यास दात आणि हिरड्यांवर प्लेक जमा होतो. त्यामुळे रक्तस्त्रावाची समस्या उद्भवते. त्याचबरोबर दात पिवळे होतात. तोंडातून दुर्गंधी येतो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या अहवालानुसार ब्रश कसा करावा? कोणत्या प्रकारचे ब्रश वापरावे तसंच ब्रश किती दिवसात बदलायचं याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत. चला तर जाणून घेऊया आरोग्य
दंतचिकित्सकांकडून महत्त्वाच्या टिप्स: डॉ. विकास गौड यांच्या मते, "टूथब्रशचा वापर जास्त दिवस करू नये. साधारणपणे दर ३ महिन्यांनी ब्रश बदलावा. विशेषत: आजारी पडल्यास ब्रश बदलायला विसरू नका. तसंच, दिवसातून दोनदा (सकाळी आणि रात्री) ब्रश करणं चांगलं आहे. त्यामुळे 2 ते 4 मिनिटे चांगल्या टूथपेस्टने ब्रश करा.''
बरेच लोक फक्त समोरची दात घासतात. त्यामुळे दातांचा आतील भाग तसाच राहून जातो. दाताचा आतील भाग स्वच्छ न केल्यास दातावर प्लास्टरसारखा (जाड थराचं आच्छादन) बसतो. दातांसोबतच जीभ स्वच्छ करणं देखील गरजेचं आहे. तोंडाची दुर्गंधी टाळण्यासाठी जीभ क्लीनर आणि ब्रशने तोंड स्वच्छ करा. कोळशाची पावडर वापरल्याने दातांवर मुलामा चढण्याचा धोका असतो.त्यामुळे अशा कृती टाळल्या तर चांगलेच आहे, अशी माहिती दंतचिकित्सक डॉ.विकास गौड यांनी दिलीय.
- नियमित तपासणी आणि साफसफाईसाठी आपल्या दंतवैद्याला भेट द्या.
- फ्लोराईड टूथपेस्टने दिवसातून दोनदा दात घासावेत.
- ब्रश करण्यापूर्वी फ्लॉस करा यामुळे अन्नाचे कण सहज बाहेर पडतात.
- संतुलित आहार घ्या.
- धूम्रपान सोडा, धूम्रपानामुळे हिरड्यांचे आजार होण्याचा धोका वाढतो.
तुमचे दात आणि हिरड्या असं स्वच्छ करा: दंतवैद्य तुम्हाला खालीलप्रमाणे दात घासण्याची आणि फ्लॉस करण्याचा सल्ला देतात.
- आपल्या हिरड्यांना काळजीपूर्वक आणि हळूवारपणे ब्रश करा.
- मऊ ब्रिस्टल्ड ब्रश आणि फ्लोराईड टूथपेस्टसह सर्व बाजूंनी हळूवारपणे दात घासा.
- पुढं आणि मागं लहान गोलाकार हालचाली आणि लहान स्ट्रोक वापरा.
- दर तीन ते चार महिन्यांनी तुमचा टूथब्रश बदला.
- तुमची जीभ हलकेच ब्रश करा किंवा तुमचे तोंड स्वच्छ ठेवण्यासाठी जीभ स्क्रॅपर वापरा.
- डेंटल फ्लॉस, प्री-थ्रेडेड फ्लॉसर, वॉटर फ्लॉसर किंवा तत्सम उत्पादनानं दात स्वच्छ करा.
- फ्लॉसिंग केल्यानंतर, आपले तोंड पाण्याने धुवा.
- इलेक्ट्रिक किंवा बॅटरीवर चालणारा टूथब्रश वापरा.
- मोठी हँडल असलेली टूथब्रश वापरा.
- तुम्हाला तुमच्या दातांमधून फ्लॉस काढण्यात अडचण येत असल्यास, फ्लॉस होल्डर वापरा.
अधिक माहितीकरिता खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
https://www.nia.nih.gov/health/teeth-and-mouth/taking-care-your-teeth-and-mouth
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचकांसाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. )