हैदराबाद : Ramoji Rao Passes Away: रामोजी ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष रामोजी राव यांचं आज निधन झालं. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि शनिवारी पहाटे 4.50 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मेगास्टार चिरंजीवी, रजनीकांत, ज्युनियर एनटीआर, रितेश देशमुखसह अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.
रामोजी राव यांच्या निधनानंतर रितेश देशमुखनं ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्यामुळं नवीन कलाकारांना संधी मिळाली असं म्हणताना रामोजी रावांमुळेच मी आज अभिनेता आहे हे त्यानं आदरांजली वाहताना नम्रपणे नमूद केलय. रितेशनं आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, "महापुरुष, श्री रामोजीराव गारू राहिले नाहीत, हे कळल्यामुळं मला खूप दुःख झालं. नवीन कलाकारांना संधी देण्याच्या त्यांच्या विश्वासामुळे मी आज अभिनेता आहे. कोणाच्या स्वप्नातही नसलेल्या गोष्टी करण्याचं धाडस त्यांनी केलं. त्यांचा वारसा कायम राहील. त्यांच्या कुटुंबीयांना आणि प्रियजनांबद्दल माझ्या मनापासून संवेदना. वैभवात विश्रांती घ्या सर. ओम शांती."
रामोजी रावांचा मृत्य झालाय ही कल्पनाच करवत नसल्याचं निर्माता दिग्दर्शक राम गोपाल वर्मानं म्हटलंय. ''रामोजी राव यांचा मृत्यू ही गोष्ट अविश्वसनीय आहे, कारण ते एका व्यक्तीतून एका संस्थेत रूपांतरित झाले होते. त्यांचं उत्तुंग व्यक्तिमत्त्व क्षितिजावर पसरल्याशिवाय तेलुगु राज्ये दिसणार नाहीत. माणसापेक्षाही ते एक शक्ती आहेत आणि त्यांच्या मृत्यूची कल्पना करणं मला कठीण आहे.'', असं राम गोपाल वर्मानं आपल्या एक्सवरील संदेशात लिहिलंय.
साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार रजनीकांत यांनी आपला मार्गदर्शक गुरू हरपल्याचं म्हटलंय. "माझे मार्गदर्शक गुरू आणि हितचिंतक श्री रामोजी राव गारू यांच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दुःख झालं. पत्रकारिता, चित्रपटसृष्टीमध्ये इतिहास रचणारा आणि राजकारणातील एक महान किंगमेकर. ते माझे मार्गदर्शक आणि माझ्या जीवनातील प्रेरणा होते. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो." असं त्यांनी लिहिलंय.
हेही वाचा -