हैदराबाद - अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2: द रुल' गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. अल्लू अर्जुन आणि चित्रपटाचा दिग्दर्शक सुकुमार यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चाही अलीकडे ऐकू येत होत्या. अल्लु अर्जुन पत्नीसह युरोपच्या सहलीवर गेला होता तर सुकुमारनं अमेरिका गाठली होती. त्यामुळे 'पुष्पा 2' चं शूटिंग थांबलं होतं. दोघांमध्ये बिनसल्याच्या चर्चेदरम्यानच आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. मात्र ठरलेल्या शेड्यूल प्रमाणे अल्लु अर्जुन 'पुष्पा' चित्रपटाच्या सीक्वेलचं शूटिंग करण्यासाठी पुन्हा सज्ज झाला आहे.
अल्लू अर्जुन आणि सुकुमार यांच्यात नेहमीच उत्तम आणि प्रेमाचं संबंध राहिले आहेत. मात्र अलिकडच्या चर्चांनी चिंता निर्माण करून त्यांच्यात संभाव्य मतभेदाचं संकेत दिले होते. आनंदाची बातमी अशी आहे की अल्लू अर्जुन हैदराबाद शहरात परतला आहे आणि लवकरच सेटवर परतणार आहे.
'पुष्पा 2' च्या टीमनं 27 जुलै रोजी रामोजी फिल्म सिटी येथे शूटिंग पुन्हा सुरू केलं आहे. सुकुमार इतर कलाकारांबरोबर विविध सीन्स शूट करत आहे, तर अल्लू अर्जुन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात टीममध्ये सामील होण्याची अपेक्षा आहे. या नवीन शेड्यूलमध्ये चित्रपटातील काही महत्त्वाच्या दृश्यांच्या शूटिंगवर लक्ष केंद्रित केलं जाईल असा अंदाज आहे.
आतापर्यंत, निर्मात्यांनी 'पुष्पा 2: द रुल' मधील दोन गाणी रिलीज केली आहेत. मे मध्ये निर्मात्यांनी 'पुष्पा पुष्पा' हे गाणं लॉन्च करुन चाहत्यांना चकित केलं होतं. याच्या हिंदी व्हर्जनला 7 कोटी व्यूव्ह्ज मिळाले होते.
गेल्या महिन्याच्या शेवटी पुष्पा राज आणि श्रीवल्ली यांच्यातील केमेस्ट्री दर्शवणारं 'अंगारों' गाणं लॉन्च झालं होतं. देवी श्री प्रसाद यांनी संगीतबद्ध केलेलं हे रकीब आलमचं गीत, श्रेया घोषालनं गायलं होतं आणि याला प्रेक्षकांनी उंदड प्रतिसाद दिला होता.
मैत्री मुव्ही मेकर्सच्या बॅनरखाली बनत असलेल्या 'पुष्पा 2' चित्रपटामध्ये अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल यांच्या भूमिका आहेत. अल्लू अर्जुनला चित्रपटाच्या पहिल्या भागातील त्याच्या अभिनयासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. लाल चंदनाच्या तस्करीच्या दुनियेतील सत्ता संघर्षाचं चित्रण यात दिसलं होतं. सुकुमार यांनी पहिल्या भागाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटाचा सीक्वेल येणार हे जाहीर झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेनं प्रतीक्षा करत आहेत.
हेही वाचा -
- 'पुष्पा 2' ची प्रतीक्षा सुरू असताना अल्लू अर्जुनच्या पत्नीनं शेअर केलेल्या रोमँटिक फोटोमुळे इंटरनेटवर वादळ - ALLU ARJUN LATEST NEWS
- 'पुष्पा 2' मुळं इतर सिनेमांचं रिलीज शेड्यूल फिसकटलं, 'पुष्पा'ची होणार 'छावा'शी टक्कर, रश्मिका मंदान्नाच्याही टेन्शनमध्ये वाढ - Pushpa 2 Vs Chhava
- 'पुष्पा 2' रिलीज पुढे ढकल्यानं चाहते नाराज, अल्लू अर्जुनच्या चाहत्यांच्या संयमाची सत्वपरीक्षा - Pushpa 2 The Rule Postponed