मुंबई - Indian 2 Makers wishes Birthday Siddharth : साऊथ आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सक्रिय असलेला अभिनेता सिद्धार्थ आज 17 एप्रिल रोजी त्याचा 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. आमिर खान स्टारर 'रंग दे बसंती' या चित्रपटातून सिद्धार्थला हिंदी चित्रपटसृष्टीत ओळख मिळाली आहे. दरम्यान त्यानं अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरीबरोबर साखरपुडा केला आहे. त्यामुळे तो सध्या खूप चर्चेत आला होता. आता सिद्धार्थनं त्याच्या वाढदिवशी चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. साऊथमधील दिग्गज दिग्दर्शक एस. शंकर यांच्या आणि सुपरस्टार कमल हासन स्टारर 'इंडियन 2'मध्ये सिद्धार्थची एन्ट्री झाली आहे.
मेकर्सनी दिली सिद्धार्थला भेट : लायका प्रॉडक्शनच्या निर्मात्यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटामधील सिद्धार्थचा फर्स्ट लुक पोस्टर रिलीज करून त्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. निर्मात्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं, 'टीम 'इंडियन 2' च्या वतीनं, अनेक व्यक्तिरेखा सहजतेनं साकारणाऱ्या सिद्धार्थला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुमचा दमदार अभिनय आणि व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांना आकर्षित करत आहेत आणि आता तुमच्या आयुष्यात आणखी एक सुंदर वर्ष आहे.' 'इंडियन 2' चित्रपटात सिद्धार्थ चित्रा वरधनरंजनची भूमिका साकारणार आहे.
'इंडियन 2' चित्रपटाबद्दल : हा चित्रपट देशातील एक राजकीय आणि भ्रष्टाचारावर आधारित आहे, जो 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'इंडियन' चित्रपटाचा भाग 2 आहे. तब्बल 28 वर्षांनंतर एस. शंकर हे चित्रपटाचा दुसरा भाग घेऊन येत आहेत. 'इंडियन 2' हा जूनमध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होत आहे, मात्र या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. या चित्रपटात कमल हासन एका सेनापतीच्या भूमिकेत दिसणार आहे. 'इंडियन 2 'मध्ये काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत दिसेल. याशिवाय या चित्रपटात रकुल प्रीत सिंग, प्रिया भवानी, नेदुमुदी वेणू, विवेक, कालिदास जयराम, गुलशन ग्रोवर आणि कॉमेडी अभिनेता ब्रह्मानंदन यांच्यासह अनेक स्टार्स झळकणार आहेत.
हेही वाचा :