मुंबई - Jnanpith Award 2023 : प्रख्यात गीतकार आणि कवी गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर देशभरातून त्यांच्या चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. यावर गुलजार यांनी व्हिडीओ संदेशात त्यांच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.
गुलजार म्हणाले, "ज्ञानपीठ पुरस्कारासाठी ज्यांनी माझी निवड केली त्या सर्वांचे आणि उर्दू भाषेतील माझ्या कविता आणि शायरी ऐकणाऱ्या लोकांचे मी आभार मानतो. मी विचार करत होतो की कदाचित चित्रपट आणि संगीतामुळे लोकांना कविता आणि शायरी ऐकण्याची माहिती नसेल. पण, जेव्हा ज्ञानपीठ पुरस्काराची घोषणा झाली, तेव्हा मला वाटले की लोकांना अजूनही उर्दू शायरी ऐकण्यात रस आहे. याचा मला खूप आनंद झाला."
निवड समितीनुसार, 2023 सालचा 58 वा ज्ञानपीठ पुरस्कार संस्कृतसाठी स्वामी रामभद्राचार्य आणि उर्दूसाठी गुलजार यांना प्रदान करण्यात येणार आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपटातील अजरामर गाण्यांचे लेखन करणारे गुलजार हे लोकप्रिय उर्दू कवी आहेत. गुलजार म्हणून प्रसिद्ध असलेले संपूर्णन सिंग कालरा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक संस्मरणीय आणि प्रतिष्ठित गाणी लिहिली आहेत. बलराज साहनी अभिनीत 'काबुलीवाला' या चित्रपटातून त्यांनी गीतकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. संगीत दिग्दर्शक एसडी बर्मन यांच्यासोबत त्यांची चांगली भट्टी जमली. जुन्या संगीतकाराबरोबर त्यांनी सलील चौधरी, विशाल भारद्वाज आणि एआर रहमान यांसारख्या संगीतकारांबरोबर काम केले. त्यांची प्रतिभा केवळ गीतलेखनापुरती मर्यादित राहिली नाही. त्यांनी आंधी, मौसम आणि टीव्ही मालिका मिर्झा गालिब यासारख्या उल्लेखनीय चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी असंख्य चित्रपटांमध्ये गाणी आणि पटकथा लिहिल्या आहेत, तसेच 'माचीस', 'आंधी', 'मौसम', 'खुशबू', 'परिचय' आणि 'कोशिश' यासह अनेक प्रशंसित वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
त्यांना यापूर्वी 2002 मध्ये उर्दूसाठी साहित्य अकादमी पुरस्कार, 2013 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, 2004 मध्ये पद्मभूषण आणि त्यांच्या कामांसाठी किमान पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत.
1961 मध्ये भारतीय ज्ञानपीठाने ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना केली होती. साहित्य अकादमी पुरस्कारांसोबतच हा भारतीय साहित्याचा अग्रगण्य पुरस्कार आहे.
हेही वाचा -