मुंबई - world book and copyright day 2024 : डिजिटल युगात जगभरातील पुस्तकांची उपलब्धता वाढली असताना, साहित्याकडे कमी होत असलेल्या रुचीमुळे चिंता आता वाढू लागली आहे. 'जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन' दरवर्षी 23 एप्रिल रोजी साजरा केला जातो. जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिवसाला, जागतिक पुस्तक दिन म्हणूनही ओळखलं जातं. या दिवशी वाचन, प्रकाशन यांना प्रोत्साहन दिलं जातं. जेवढं चांगलं वाचाल, तेवढीच चांगली प्रगती होते, हे सर्वांनाच माहित आहे. आता अनेक पुस्तक डिजिटल स्वरूपात आली आहेत. ही वाचून देखील तुम्ही तुमच्या ज्ञात भर वाढवू शकतात. पुस्तक हा माणसाचा सर्वात चांगला मित्र आहे, असं म्हणतात. तो कोणत्याही परिस्थितीत माणसाला एकटं सोडत नाही. जागतिक पुस्तक दिनानिमित्त आपण त्या महान व्यक्तींचं स्मरण करतो ज्यांनी आपल्या लेखनातून जगाला एक नवा मार्ग दाखवला आहे.
पुस्तक भेट देऊन हा दिवस साजरा करा : मुन्शी प्रेमचंद , पु.ल. देशपांडे, साने गुरुजी, वि.वा. शिरवाडकर, प्र.के. अत्रे, शांता शेळके , लक्ष्मण देशपांडे या साहित्यिकांनी समाजाला ज्ञानाचा खजिना दिला आहे. पूर्वी लोक पुस्तकांच्या शोधात भटकत असत, पण आता मोबाईल फोनवर इंटरनेट उपलब्ध झाल्यानं लोक कुठेही ऑनलाइन साहित्य वाचू शकतात. जागतिक पुस्तक दिनानिमित्त अनेक शाळांमध्ये आणि वेगवेळ्या ठिकाणी आज पुस्तक मेळावे, पुस्तक संबंधित उपक्रम, पुस्तक वितरण केलं जातं. आजच्या दिवशी एकामेंकांना पुस्तक भेट देऊन हा दिवस तुम्ही साजरा करू शकता.
महान व्यक्तींची पुण्यतिथी : 23 एप्रिल ही जागतिक साहित्यासाठी महत्त्वाची तारीख आहे, कारण याचं दिवशी अनेक महान व्यक्तींची पुण्यतिथी आहे. पुस्तकं आणि लेखकांचे स्मरण व्हावं या उद्देशानं या दिवशी जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो. जागतिक पुस्तक दिनानिमित्त युनेस्कोच्या राष्ट्रीय परिषदा, युनेस्को क्लब, ग्रंथालये, केंद्रीय संस्था, शाळा आणि इतर शैक्षणिक संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून या दिवशी पुस्तकाचं महत्त्व समजून सांगितलं जातं.
जागतिक पुस्तक दिनाचा इतिहास : जागतिक पुस्तक दिन पहिल्यांदा 1923 मध्ये स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी मिगुएल डी सर्व्हंटेस नावाच्या प्रसिद्ध लेखकाला श्रद्धांजली वाहण्यासाठी स्थापित केला होता. या दिवशी मिगुएल डी सर्व्हंटेसची पुण्यतिथी आहे. यानंतर युनेस्कोनं 23 एप्रिल रोजी साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय प्रसिद्ध लेखक विल्यम शेक्सपियर यांची जन्मतारीख आणि पुण्यतिथी एकाच दिवशी म्हणजे 23 एप्रिलला होती. त्यामुळे त्यांना आदरांजली वाहण्याच्या उद्देशानं हा दिवस निवडण्यात आला. शेक्सपियर हा एक महान लेखक होता. ज्यांनी सुमारे 35 नाटके आणि 200 हून अधिक कविता लिहिल्या होत्या.
हेही वाचा :