नवी दिल्ली RBI MPC Meeting 2024 : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज 2024 चं पहिलं पतधोरण जाहीर केलंय. यावेळी त्यांनी रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयनं आपल्या पतधोरण आढाव्याच्या निर्णयानुसार रेपो रेट कमी केलेला नाही, त्यामुळं रेपो दर 6.5 टक्के राहिलाय. तर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी म्हणजेच एमएसएफ आणि बँक रेट 6.75 टक्क्यांवर कायम आहे.
कर्जाच्या ईएमआयमध्ये सवलत मिळण्याची शक्यता नाही : बँकेच्या पतधोरणानंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आपल्या भाषणात ही घोषणा केलीय. याचा अर्थ सध्या तुमच्या कर्जाच्या ईएमआयमध्ये सवलत मिळण्याची शक्यता नाही. 6 फेब्रुवारीपासून सुरू झालेली ही चलन धोरण समितीची बैठक आज संपली. या आढाव्यात आरबीआयनं पत धोरणांतर्गत 'विथड्रॉवल ऑफ ॲकॉमोडेशन'ची भूमिका कायम ठेवलीय. औद्योगिक आघाडीवर, ग्रामीण मागणीत सुधारणा आणि उत्पादन क्षेत्रातून चांगले आकडे दिसत असल्याचं आरबीआय गव्हर्नरनी म्हटलंय.
पुढील वर्षात किती असेल आर्थिक विकास दर : 2024 या चालू वर्षामध्ये महागाई आणखी कमी होण्याची अपेक्षा असल्याचं मत आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केलंय. तसंच ग्लोबल ग्रोथ नियमीत राहण्याची शक्यता आहे. तर अनेक देशातील वाढती कर्ज हा चिंतेचा विषय असल्याचं दास म्हणाले. पुढील आर्थिक वर्षात भारताची ग्रोथ चांगली राहणार असून पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच 2024-25 मध्ये आर्थिक विकास दर 7 टक्के राहण्याचा अंदाज दास यांनी यावेळी व्यक्त केलाय. तर पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच 2024-25 मध्ये महागाई दर हा 4.5 टक्के राहण्याचा अंदाज आहे.
किती असेल महागाई दर : यासोबतच आरबीआयनं चालू आर्थिक वर्षात किरकोळ महागाई दर 5.4 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. CPI किंवा किरकोळ चलनवाढीचा दर पुढील आर्थिक वर्षासाठी म्हणजेच 2024-25 साठी 4.5 टक्के असण्याचा अंदाज आहे. पुढील चार तिमाहींसाठी किरकोळ महागाईचा दर कसा असेल,
- 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत - 5 टक्के
- 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत - 4 टक्के
- 2024-25 च्या तिसऱ्या तिमाहीत - 4.6 टक्के
- 2024-25 च्या चौथ्या तिमाहीत - 4.7 टक्के
हेही वाचा :