नवी दिल्ली : Rajya Sabha election 2024 : आज राज्यसभेची निवडणूक झाली. उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशातील राज्यसभेच्या 15 जागांसाठी ही निवडणूक झाली. उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभेच्या 10 जागांवर निवडणूक झाली, त्यामध्ये भाजपाचे 8 उमेदवार विजयी झाले. तर, समाजवादी पक्षाचे 2 उमेदवार विजयी झाले. या सर्व 10 जागांसाठी 395 मतदारांनी मतदान केलं आहे.
उत्तर प्रदेश राज्यसभा निवडणुकीत भाजपाचे आमदार सुधांशू त्रिवेदी, आरपीएन सिंग, चौधरी तेजवीर सिंग, साधना सिंग, अमरपाल मौर्य, संगीता बलवंत आणि नवीन जैन विजयी झाले आहेत. तर, समाजवादी पक्षाच्या जया बच्चन आणि पीडीएचे उमेदवार रामजीलाल सुमन यांनीही राज्यसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. सपाचा तिसरे उमेदवार माजी आयएएस आलोक रंजन यांचा पराभव झाला आहे. येथील समाजवादी पार्टीच्या 7 आमदारांनी क्रॉस वोटींग केल्यानं भाजपाच्या उमेदवराचा विजय झाला.
सपा आमदारांचे भाजपला मतदान : उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभेच्या 10 जागांवर निवडणूक झाली. या 10 जागांसाठी 399 पैकी 395 आमतदारांनी मतदान केलं. माजी मंत्री गायत्री प्रजापती यांच्या पत्नी महाराजी देवी मतदानासाठी आल्या नाहीत. तसंच, समाजवादी पक्षाच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं. मिळालेल्या माहितीनुसार, सपाच्या 7 आमदारांनी भाजपाच्या बाजूने मतदान केलं. त्यामुळे भाजपाला आठ जागा मिळवण्यात यश आलं आहे.
सपामध्ये मोठा गोंधळ : मंगळवारी राज्यसभेच्या 10 जागांसाठी मतदान सुरू होताच समाजवादी पक्षात गोंधळ झाला. पक्षाचे चीफ व्हिप आणि उंचाहरचे आमदार मनोज पांडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. याशिवाय सपाच्या इतर चार आमदारांनीही जय श्री रामचा नारा देत क्रॉस मतदान केलं. सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पक्षाच्या इतर काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचं त्यांनी स्वतः मान्य केलं असून आता त्यांच्यावर मोठी कारवाई केली जाणार आहे.
कर्नाटकमध्ये काँग्रेसची एकता दिसून आली : कर्नाटकमध्ये भाजपाचे उमेदवार नारायण बंडगे विजयी झाले आहेत. तर, भाजप-जेडी(एस) उमेदवार कुपेंद्र रेड्डी यांचा पराभव झाला आहे. तर काँग्रेसचे अजय माकन, डॉ. सय्यद नसीर हुसेन आणि जीसी चंद्रशेखर हे तिन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. अजय माकन 47 मतांनी, नसीर हुसेन 46 मतांनी आणि जीसी चंद्रशेखर 46 मतांनी विजयी झाले आहेत. कर्नाटकमध्ये काँग्रेसची एकता या निवडणुकीत दिसून आली आहे.
हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेश विधानसभेत कॉंग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत असूनही आज पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार अभिषेक मनू सिंघवी यांना पराभव पत्करावा लागला. अटीतटीच्या झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजप उमेदवार हर्ष महाजन यांचा विजय झाला आहे. हिमाचल प्रदेशात कॉंग्रेस सत्तेत असूनही अधिकृत उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाने हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
निवडणुकीचा काय? फॉर्मूला आहे? : राज्यसभेला अप्पर हाऊस म्हणजेच वरिष्ठ सभागृह किंवा काऊन्सिल ऑफ स्टेट्स असंही संबोधलं जातं. स्वातंत्र्यानंतर पहिल्या निवडणुकीनंतर लोकसभेबरोबरच आणखी एक सभागृह असावं, अशी कल्पना समोर आली. वरिष्ठ सभागृह असं संबोधण्यात येत असलं तरी राज्यसभेच्या तुलनेत लोकसभेचे अधिकार थोडे जास्त आहेत. राज्यसभेत जास्तीत जास्त 250 जागा असू शकतात. यापैकी 12 सदस्य राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित केले जातात. तर 236 सदस्य देशातील सर्व राज्यांतून आणि 2 सदस्य केंद्रशासित प्रदेशांतून निवडले जातात. सध्या राज्यसभेची सदस्य संख्या 245 इतकी आहे. यापैकी 233 सदस्य राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात. तर 12 सदस्यांना राष्ट्रपती नामनिर्देशित करतात. राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले उमेदवार प्रामुख्याने कला, विज्ञान, सामाजिक कार्य अशा क्षेत्रांशी निगडित असतात.
- राज्यसभा हे स्थायी सभागृह : राज्यसभा स्थायी सभागृह आहे. हे कधीच भंग होत नाही. भारताचे उपराष्ट्रपती या सदनाचे सभापती असतात. इथल्या सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येतो. त्यांच्या जागी नवे उमेदवार राज्यसभेवर निवडून जातात.
हेही वाचा :
1 अर्थसंकल्पीय अधिवेशन 2024 : पोलीस शिपाई पदाच्या १७ हजार ४७१ रिक्त जागा भरण्यात येणार
2 आदिवासी बांधवांची होळी अंधारात गेल्यास सरकार जबाबदार; यशोमती ठाकूर यांचा विधानसभेत हल्लाबोल