नवी दिल्ली NDA Leaders Meeting : लोकसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापनेचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या अनुषंगानं बुधवारी दुपारी 4 वाजता एनडीएची पहिली बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानी झाली. तासभर चाललेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एनडीएचे नेते म्हणून निवड करण्यात आली. या बैठकीला 16 पक्षांचे 21 नेते उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीएच्या खासदारांची 7 जूनला बैठक होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत ते राष्ट्रपतींकडं सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत.
लोकसभा विसर्जित : राजनाथ सिंह, अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना सर्व मित्रपक्षांशी चर्चा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोकसभा विसर्जित केली.लोकसभा निवडणुकीत भाजपाला 240 जागा मिळाल्या आहेत. तसंच एनडीए घाडीनं 292 जागांसह बहुमताचा आकडा पार केलाय. चंद्राबाबूंचा टीडीपी 16 जागांसह आघाडीतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. नितीश कुमारांचा जेडीयू 12 जागांसह तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. बहुमतासाठी भाजपाला यावेळी दोन्ही पक्षाची मदत घ्यावी लागणार आहे. त्यांच्याशिवाय भाजपाला सरकार स्थापन करता येण्याची शक्यता दिसत नाही.
नरेंद्र मोदींची NDA च्या नेतेपदी निवड : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील NDA सरकारच्या लोककल्याणकारी धोरणांमुळं गेल्या 10 वर्षात देशातील 140 कोटी जनतेनं प्रत्येक क्षेत्रात विकास झालेला पाहिला आहे, असा ठराव NDA नेत्यांनी बैठकीत मंजूर केला. तब्बल सहा दशकांनंतर देशातील जनतेनं सलग तिसऱ्यांदा NDA आघाडीला पूर्ण बहुमत दिलं आहे. पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएनं संपूर्ण एकजुटीनं निवडणूक जिंकल्याचा अभिमान आहे. यावेळी बैठकीत सर्वांनी एकमतानं नरेंद्र मोदींना NDA नेते म्हणून निवड केलीय. 7 जून रोजी NDA संसदीय पक्षाची बैठक होणार आहे. ज्यामध्ये मोदींची संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड केली जाईल. त्याच दिवशी पंतप्रधान मोदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करतील.
हे वाचलंत का :
- आता स्थापन होणारं सरकार हे युतीचं सरकार असेल, कशाप्रकारे असू शकतं भाजपा युतीचं सरकार? - LOK SABHA ELECTION RESULTS 2024
- पराभवाची सगळी जबाबदारी माझी, मला मंत्रिमंडळातून मोकळं करा : देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय? - Devendra Fadnavis On Election Result
- अशोक चव्हाण भाजपात गेले तेच पथ्यावर पडलं, 'जायंट किलर' वसंतराव चव्हाणांची स्पष्टोक्ती - Giant Killer Vasantrao Chavan