नवी दिल्ली Jaya Bachchan In Rajya Sabha : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या गदारोळानंतर शुक्रवारी (2 ऑगस्ट) राज्यसभेत हशा पिकला. समाजवादी पक्षाच्या खासदार राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी आज सभागृहात स्वत:चं नाव 'जया अमिताभ बच्चन' असे घेतलं. जया बच्चन यांनी असं म्हणताच सर्वच जण हसायला लागले. याचं कारण म्हणजे दोन दिवसांपूर्वीच जया बच्चन यांनी आपल्या नावापुढं अमिताभ बच्चन यांचं नाव जोडण्यात आल्यामुळं आक्षेप घेतला होता. मात्र, शुक्रवारी राज्यसभेत त्या बोलायला उभं राहिल्या तेव्हा त्यांनी आपल्या बोलण्याची सुरुवात 'मी जया अमिताभ बच्चन...' म्हणत केली.
सभागृहात नेमकं काय घडलं? : सभागृहात एका मुद्द्यावर बोलण्यासाठी जया बच्चन उभ्या राहिल्या. यावेळी त्यांनी आपलं नाव 'जया अमिताभ बच्चन' असं घेतलं. त्यानंतर सभापती जगदीप धनखर यांच्यासह सर्वचजण हसायला लागले. पुढं जया बच्चन म्हणाल्या की, "सर, मी जया अमिताभ बच्चन तुम्हाला विचारत आहे की तुम्ही दुपारचं जेवण केलं की नाही? कारण जयरामजींचं नाव घेतल्याशिवाय तुमचं जेवण पचत नाही..." , असं त्या म्हणाल्या.
Rajyasabha Chairman VP Jagdeep Dhankhar laughed so hard when she introduced herself as " jaya amitabh bachchan" 😂😭😂 pic.twitter.com/7SQ2M1XB8X
— Pooja Sangwan 🇮🇳 (@ThePerilousGirl) August 2, 2024
जया बच्चन उपसभापतींवर का भडकल्या? : दोन दिवसांपूर्वी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी सभागृहात जया बच्चन यांना 'मिसेस जया अमिताभ बच्चन' असं संबोधलं. यावर जया बच्चन सभागृहात उपसभापतींवर भडकल्या. "तुम्ही जया बच्चन म्हटलं असतं तरी पुरे झालं असतं," असं त्या उपसभापतींना म्हणाल्या. महिलांची स्वतःची ओळख आहे. याची आठवण त्यांनी सर्व खासदारांना करून दिली. यावेळी त्यांनी खासदारांना महिलांना ओळख नाही का? असा प्रतिप्रश्न केला होता.
महिलांचं काहीच अस्तित्व नाही का? : जया बच्चन यांनी आक्षेप घेतल्यावर उपसभापतींनी त्यांना आठवण करून दिली की, रेकॉर्डवरील त्यांचं पूर्ण नाव 'जया अमिताभ बच्चन' असंच आहे. मात्र, त्यांनी यावर नाराजी व्यक्त केली. 'आता एक नवीन ट्रेंड उदयाला येत आहे. महिलांना त्यांच्या पतीच्या नावानं ओळखलं जातंय. महिलांचं काहीच अस्तित्वात नाहीत का? असा खडा सवाल जया बच्चन यांनी केला.
हेही वाचा -