चंदीगड : बिहारच्या कुख्यात मोस्ट वाँटेड गँगस्टरचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आलं. बिहार आणि हरियाणा या दोन राज्यातील पोलिसांनी मिळून त्याचा एन्काऊंटर केला. बिहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंड सरोज राय असं कुख्यात गँगस्टरचं नाव आहे. सरोजवर 32 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. बिहारमधील सीतामढी इथल्या जनता दल युनायटेडच्या आमदाराकडून खंडणी मागितल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. बिहार पोलिसांनी गँगस्टर सरोज रायवर 2 लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं.
बिहारच्या मोस्ट वॉन्टेड गँगस्टरचा गुरुग्राममध्ये खात्मा : बिहारचा कुख्यात गँगस्टर सरोज राय हा मागील काही दिवसांपासून पोलिसांना मोस्ट वाँटेड होता. त्याला हरियाणा आणि बिहार पोलीस शोधत होते. मात्र तो पोलिसांना ताकास तूर लागू देत नव्हता. बिहार आणि हरियाणा या दोन राज्याच्या पोलिसांनी संयुक्तपणे त्याचा शोध सुरू केला. अखेर गुरुग्राममध्ये कुख्यात गँगस्टर सरोज राय आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. या चकमकीत गँगस्टर सरोज रायचा खात्मा करण्यात बिहार आणि हरियाणाच्या पोलिसांना यश आलं. या चकमकीत बिहार पोलिसांच्या एका जवानाला गोळी लागल्यानं हा जवान जखमी झाला. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बिहार पोलीस जवानाच्या हाताला गोळी लागली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
गुरुग्राममध्ये करणार होता गुन्हेगारी कारवाया : मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील कुख्यात गुन्हेगार सरोज राय गुरुग्राममध्ये लपून बसल्याची माहिती बिहार पोलिसांना मिळाली. सरोज राय हा हरियाणात गुन्हेगारी कट करणार असल्याची माहिती बिहार पोलिसांना मिळाली. सरोज राय हा मेवातहून गुरुग्राममध्ये प्रवेश करु शकतो, अशी खात्रीलायक माहिती मिळताच गुरुग्राम पोलिसांनी बिहार पोलिसांसह शहरात नाकाबंदी सुरू केली. त्यानंतर शोध मोहीम सुरू केल्यानंतर सरोज राय याच्याबाबतची घटना घडली.
सरोज रायचा साथीदार पळून जाण्यात यशस्वी : तपासणी मोहिमेत दुचाकीस्वार दोन तरुण गुर्जर चौकीजवळून जाऊ लागले. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी या तरुणांना थांबण्याचा इशारा केला. मात्र त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. यामुळे पोलिसांनी प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात गँगस्टर सरोज रायचा मृत्यू झाला. त्याचा एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला.
सरोज रायवर होते 2 लाखांचं बक्षीस : पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, चकमकीदरम्यान गँगस्टर सरोज रायचा मृत्यू झाला. या कारवाईत बिहार पोलिसांचा जवानही जखमी झाला आहे. सरोज राय या बिहार राज्यातील सीतामढी जिल्ह्यातील बत्रौली गावचा रहिवासी होता. सरोज राय यानं रन्निसैदपूरचे जेडीयू आमदार पंकज मिश्रा यांच्याकडं खंडणीची मागणी केली. यानंतर तो बिहार एसटीएफच्या हिटलिस्टमध्ये आला. त्यानंतर बिहार एसटीएफनं सरोजवर 2 लाखांचं बक्षीस जाहीर केलं.
बिहार आणि हरियाणा पोलिसांची संयुक्त कारवाई : बिहार पोलिसांना गँगस्टर सरोज राय हरियाणामध्ये पोहोचल्याची माहिती मिळाली. बिहार एसटीएफनंही त्याचा पाठलाग करून हरियाणा गाठलं. बिहार पोलिसांनी गुरुग्राम पोलिसांसह संयुक्तपणे नाकाबंदी केली. सरोज राय त्याच्या साथीदारासह दुचाकीवरुन गुर्जर चौकीजवळ आला. यावेळी पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला. मात्र सरोज राय यानं पोलीस जवानांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलीस पथकानंही सरोज रायवर गोळीबार केला. यात गोळी लागल्यानं गँगस्टर सरोजचा मृत्यू झाला. या चकमकीत बिहार पोलीस दलातील जवानालाही गोळी लागली. त्यांच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. याबाबत गुरुग्रामचे एसीपी वरुण दहिया यांनी सांगितलं की, "सरोज राय याचा चकमकीत मृत्यू झाला आहे. बिहार व्यतिरिक्त गुरुग्राम किंवा हरियाणाच्या इतर भागातही त्यानं काही गुन्हे केले आहेत, का हे शोधण्यासाठी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत."
हेही वाचा :