पटना Bihar Floor Test : बिहार विधानसभेत आज नितीश कुमारांनी विश्वासदर्शक ठराव जिंकलाय. प्रस्तावाच्या बाजूनं 129 मतं पडली. विशेष म्हणजे मतदानादरम्यान विरोधकांनी सभात्याग केला. अशा स्थितीत विरोधात शून्य मतं पडली.
प्रस्तावाच्या बाजुनं 129 मतं : विश्वासदर्शक मतदानाचा निकाल हा राजद, काँग्रेस आणि डाव्या आघाडीसाठी मोठा धक्का मानला जातोय. आनंद मोहन यांचा मुलगा आणि आरजेडी आमदार चेतन आनंद, नीलम देवी आणि प्रल्हाद यादव मतदानापूर्वी सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसले होते. यामुळं नितीशकुमार सहज बहुमत मिळवतील हे स्पष्ट झालं. बिहारमध्ये एनडीएचे 128 आमदार आहेत. यात विधानसभा अध्यक्षांचा एक मत कमी झाला. तर एक आमदार दिलीप राय विधानसभेत पोहोचू शकले नाहीत. यामुळं ही संख्या 126 झाली. त्यातच राजदच्या तीन आमदारांच्या पाठिंब्याची भर पडल्यानं त्यांच्या बाजूनं मतदान करणाऱ्यांची संख्या 129 झाली. मतदानापूर्वी बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या सरकारबाबत अनेक प्रकारच्या अटकळी बांधल्या जात होत्या. 'खेला हेणार' असा दावा राजदनं केला होता. मात्र तीन आमदार फुटल्यानं त्याचा खेळ उलटला.
विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव : विश्वासदर्शक ठरावावर मतदान करण्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष अवध बिहारी चौधरी यांना हटवण्याचा प्रस्ताव आणण्यात आला होता. एनडीएनं विधानसभा अध्यक्षांविरोधात मांडलेल्या या अविश्वास प्रस्तावाला 243 सदस्यीय विधानसभेत 125 आमदारांचा पाठिंबा मिळाला, तर 112 सदस्यांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलं.
बिहार विधानसभेचं गणित काय : बिहार विधानसभेत भाजपाचे 78, जेडीयूचे 45, जीतन राम मांझी यांच्या एचएएमचे 4 आणि एक अपक्ष आमदार आहेत. त्यांची एकूण संख्या 128 आहे. तर विरोधी गटात राजदचे 79, काँग्रेसचे 19 आणि डाव्या आघाडीचे 16 आमदार आहेत. एक आमदार एआयएमआयएमचा आहे. त्यांची एकूण संख्या 115 आहे. आरजेडीच्या तीन आमदारांनी बाजू बदलल्यानं त्यांची संख्या 112 झाली.
हेही वाचा :