जर तुम्ही तरुण असाल आणि तुम्ही स्मार्टफोनवर बराच वेळ घालवत असाल, तर त्यामुळे तुमच्या मानसिक आरोग्यामध्ये झपाट्याने घट होऊ शकते, असे एका नवीन संशोधनात म्हटले आहे. स्मार्टफोनच्या अधिक वापर आणि समाजिक अलगीकरणाने 18 ते 24 वयोगटांतील तरुणांचे मानसिक आरोग्य घटत असल्याचे सेपियन लॅबने आपल्या अहवालात म्हटले आहे.
हेही वाचा - Baby health : लहान मुलांना मसाज करताना 'ही' घ्या काळजी
लोक आता 7 ते 10 तास ऑनलाईन असतात हे डेटातून पुढे आले आहे, यामुळे लोकांना स्वत:साठी, समाजात वावरण्यासाठी कमी वेळ उरतो, अशी माहिती सेपियन लॅबच्या मुख्य शास्त्रज्ञ तारा थियागराजन यांनी दिली. इंटरनेटच्या आधी, कोणी व्यक्ती 18 वर्षांची होईपर्यंत तिने 15 हजार ते 25 हजार तास कुटुंबासोबत घालवले असतील, असा आमचा अंदाज होता. मात्र, आता संशोधनात असे दिसून आले आहे की, इंटरनेटच्या युगात ही आकडेवारी 1 हजार 500 ते 5 हजार तासांपर्यंत कमी झाली आहे, अशी चिंता थियागराजन यांनी व्यक्त केली.
समाजिक संवाद लोकांना हावभाव, देहबोली, शारीरिक स्पर्श, योग्य भावनिक प्रतिसाद आणि सामाजिक, भावनिक विकासासाठी आवश्यक जीवन कौशल्ये शिकवतो. या कौशल्यांशिवाय, लोकांना ते समाजापासून अलिप्त झाल्याचे वाटू शकते आणि शक्यतो ते आत्महत्येचा विचार करू शकतात, अशीही चिंता थियागराजन यांनी व्यक्त केली.
या अहवालात असेही दिसून आले आहे की, साथीच्या काळात, प्रत्येक तरुण वयोगटातील मानसिक आरोग्य अधिक नाटकीयरित्या घसरले आहे. 34 देशांमधून मिळालेल्या डेटानुसार, 18 ते 24 वयोगटातील घट ही विशेषत: साथीच्या आगोदर, मात्र तिची सुरुवात ही 2010 नंतर स्मार्टफोनच्या वापराच्या वाढीबरोबरच झाली. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, वर्ष 2010 पूर्वी तरुणांचे मानसिक आरोग्य सर्वात उच्च पातळीचे होते, मात्र नंतर ते घटत गेले.
या अभ्यासात 18-24 वयोगटातील बहुसंख्य तरुणांना प्रभावित करणारी किंवा वृद्ध प्रौढांच्या तुलनेत सर्वात लक्षणीय वाढलेली किंवा बिघडलेली मुख्य लक्षणे सांगितली आहेत. यात विचित्र किंवा अनावश्यक विचार, वास्तवापासून अलिप्त असल्याची भावना, आत्मघाती विचार, भीती आणि चिंता, दुःख, त्रास किंवा निराशेच्या भावना, या लक्षणांचा समावेश आहे.
आपण किशोरवयीन मुलांबद्दल बोललो तर, अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जे किशोरवयीन मुले सोशल मीडियाचा अति प्रमाणात वापर करतात ते तणावग्रस्त असतात, त्यांना एकटे वाटते, त्यांचे मित्र कमी असतात. सोशल मीडिया वापरणे वाईट नाही. पण, त्यामुळे किशोरवयीनांना त्याचे व्यसन जडत आहे हे चिंताजनक आहे.
तुमच्या किशोरवयीन मुलाचे वर्तन खाली नमूद केलेल्या एक किंवा अधिक मुद्द्यांसारखे असल्यास त्यास सोशल मीडियाचे व्यसन असू शकते:
- जर एखादी व्यक्ती बहुतेक वेळा सोशल मीडियाबद्दल विचार करत असेल आणि बोलत असेल.
- जर ते दिवसातून अनेक वेळा सोशल मीडियाचा वापर करत असेल.
- जर ते त्यांच्या आयुष्यातील इतर महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी सोशल मीडिया वापरत असतील.
- जर ते इतर महत्त्वाच्या कामांमध्ये विलंब करत असतील आणि त्याऐवजी सोशल मीडिया वापरत असतील.
- सोशल मीडिया वापरता न येण्याबद्दल जर ते निराश होत असतील आणि संताप व्यक्त करत असतील.
- जर सोशल मीडियाच्या वापरामुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम झाला असेल.
- जर ते संभाषणादरम्यान त्यांचे सोशल मीडिया खाते तपासत असतील तर.
- जर एखादी व्यक्ती सोशल मीडियावर राहण्यासाठी सामाजिक कार्यक्रम टाळत असेल.
- जर ते सोशल मीडियावर घालवलेल्या वेळेबद्दल खोटे बोलत असतील.
- जर ते सोशल मीडियावर घालवणारा वेळ कमी करू शकले नाहीत.
अभ्यासात असे आढळून आले आहे की, तीस मिनिटे सोशल मीडियाचा वापर एखाद्या व्यक्तीच्या मूडला चालना देण्यास मदत करते. परंतु, दिवसातून दोन तासांपेक्षा जास्त वेळ सोशल मीडियाचा वापर केल्यास नैराश्याची लक्षणे विकसित होण्याचा धोका वाढू शकतो. म्हणून, याबाबत समतोल साधला पाहिजे आणि सोशल मीडिया साधनांचा प्रभावीपणे वापर केला पाहिजे.
(IANS)
हेही वाचा - 5 amazing home remedies for Tanning : शरीराचे टॅनिंग घालवण्यासाठी 5 टिप्स