नवी दिल्ली : एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे अनेक वस्तुंच्या किमतीतही बदल घडून येतात. याचा आपल्या जीवनावर अनेक प्रकारचा परिणाम होतो. नवीन आर्थिक वर्षात कारच्या किमती वाढून सोन्याच्या दरातही बदल होतात. त्यामुळे जाणून घेऊया नेमके नवीन आर्थिक वर्षात काय बदल होणार आहेत, याविषयीची माहिती.
सिलिंडरच्या किमतीत बदल : दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल करतात. गेल्या महिन्यातही गॅसच्या दरात वाढ झाली होती. आता शनिवारीही गॅसच्या दरात बदल दिसून येऊ शकतात. यासोबतच सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या किमतीतही बदल झाल्याचे दिसून येऊ शकते. नवीन आर्थिक वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही मोठ्य़ा प्रमाणावर फरक जाणवू शकतो.
सोने विक्रीचे नियम बदलणार : सरकारने 4 अंकाऐवजी 6 अंकाच्या हॉलमार्कला वैधता दिली होती. त्यामुळे अगोदरच्या चार अंकी हॉलमार्कला आता बंदी असेल. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सोन्याचे दागिने विक्रीचे नियम बदलणार आहेत. शनिवारपासूनच नवीन दागिन्यांवर हे नियम लागू होणार आहेत. नवीन दागिन्यांवर सहा अंकी हॉलमार्क अनिवार्य केला असला, तरी ग्राहक त्यांचे जुने दागिने हॉलमार्कशिवाय विकू शकत असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.
डिमॅटला नॉमिनी बंधनकारक : सरकारने 1 एप्रिल 2023 पासून गुंतवणूकदारांसाठी असलेल्या नियमात बदल केला आहे. आता 1 एप्रिलपासून सर्व गुंतवणूकदारांना त्यांच्या डिमॅट खात्यात नॉमिनीचे नाव नोंदवणे बंधनकारक केले आहे. गुंतवणूकदारांनी जर नॉमिनीचे नाव टाकले नाही, तर डिमॅट खाते जप्त करण्यात येणार आहे.
विम्याच्या कमाईवर कर : नवीन आर्थिक वर्षापासून उच्च प्रीमियम विम्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर भरावा लागणार आहे. सरकारने 2023 च्या अर्थसंकल्पात याबाबतची घोषणा केली होती. सरकारने प्रथमच विम्याच्या कमाईवर कर भरावा लागणार असल्याचा नियम केला आहे.
कारच्या वाढणार किमती : आपल्या दारी कार असावी असे सगळ्यांना वाटते. मात्र 1 एप्रिलपासून कारच्या किमती वाढणार असल्याचे सर्व कार उत्पादक कंपन्यांनी आधीच जाहीर केले आहे. शनिवारपासून सर्व लक्झरी वाहनांच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे.
हेही वाचा - Ram Navami २०२३ : रामनवमीला बनवा या खास डिश, तुमचा सण होईल आनंदात साजरा