हैदराबाद : भारतात स्त्रियांना पुरुषाच्या बरोबरीने समान दर्जा देण्यासाठी अनेक संघटना आणि समाज सुधारक कार्य करत आहेत. मात्र भारतातील विधवांच्या प्रश्नाकडे डोळेझाक करण्यात येत असल्याचा आरोप होत राहतो. विधवांना त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने 23 जून हा दिन आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तेव्हा जाणून घेऊया काय आहे विधवा दिनाचा इतिहास, महत्व आणि उद्देश याबाबतची माहिती.
काय आहे विधवा दिनाचा इतिहास : कोणत्याही स्त्रिला आपल्या जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे. मात्र काही कारणास्तव त्यांचा जोडीदार गमावल्याने अशा महिलांना एकाकी आयुष्य जगावे लागते. त्यामुळे विधवा महिलांचे प्रश्न मोठे भयंकर आहेत. विधवा महिलांचा प्रश्न फक्त भारतातच नाही, तर जगभरात गंभीर होत चालला आहे. त्यासाठी गेल्या सात वर्षापासून यूकेची लूम्बा फाउंडेशन ही संस्था जगभरातील विधवा महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात संयुक्त राष्ट्रांमध्ये मोहीम राबवत आहे. विधवांचे प्रश्न बिकट झाल्याने संयुक्त राष्ट्र संघाने 23 जून 2011 हा दिवस आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
काय आहे विधवा दिन साजरा करण्याचा उद्देश : जागतिक पातळीवर विधवा महिलांचे प्रश्न भयंकर असल्याने संयुक्त राष्ट्राने 23 जून हा आंतरराष्ट्रीय विधवा दिन साजरा करण्याचे जाहीर केले. त्यानुसार दरवर्षी विधवा दिनाचे औचित्य साधून या दिवशी विधवा महिलांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. जगभरातील विधवा महिलांची स्थिती सुधारावी, त्यांना इतर महिलांसारखे सामान्य जीवन जगता यावे यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करण्यात येतात. इतर सामान्य महिलांसारखे त्यांना समान हक्क मिळण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघ प्रयत्न करते. मात्र आपण कितीही प्रगत झालो, तरी विधवा महिलांकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलत नाही.
विधवांना करावा लागतो शारीरिक शोषणाचा सामना : जागतिक पातळीवर विधवा महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. पती नसल्याने कुटूंब त्यांच्याकडे विशेष लक्ष देत नाही. तर कधी विधवा महिलांना वाऱ्यावर सोडले जाते. यामुळे जगभरातील लाखो विधवा महिला गरिबी, हिंसाचार, बहिष्कार, बेघरपणा, आजारी आणि समाजातील भेदभाव सहन करतात. जगभरातील 115 दशलक्ष विधवांना गरिबीत जगण्यास भाग पाडले जाते. तर 81 दशलक्ष महिलांना शारीरिक शोषणाचा सामना करावा लागत असल्याचे विविध अहवालातून स्पष्ट झाले आहे. जागतिक पातळीवर विधवा महिलांच्या न्याय हक्काचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यात भारतातही विधवा महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. भारतात चार कोटींहून अधिक विधवा महिला आहेत. आजही विधवा महिला त्यांच्या हक्कापासून वंचित आहेत. या विधवा महिलांना पती नसल्याने मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते.