यवतमाळ - अवकाळी पावसामुळे हाता तोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या दोन घटना जिल्ह्यातील विविध दोन ठिकाणी घडल्या आहेत. महागाव तालुक्यातील मुडाणा येथील मोहन राठोड तर आर्णी तालुक्यातील दातोडी येथील साष्टांग गावंडे अशी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. साष्टांग गावंडे यांनी काल सायंकाळी तर मोहन राठोड यांनी शुक्रवारी पहाटे आत्महत्या केली.
हेही वाचा - यवतमाळमघ्ये अवकाळीच्या संकटात शेतकऱ्याने पिकावर फिरविला ट्रॅक्टर
साष्टांग गावंडे यांच्याकडे ५ एकर शेती असून त्यांच्यावर १ लाख रुपयांचे कर्ज आहे. त्यांनी यावर्षी कापूस आणि सोयाबीन या पिकांची लागवड केली होती. मात्र, परतीच्या पावसाने त्यांच्या शेतातील सोयाबीन शेतातच सडून गेले आणि कापूस ओला झाल्याने नुकसान झाले. मोहन राठोड यांच्याकडे ५ एकर शेती असून त्यांच्यावर २ लाख रुपयांचे कर्ज आहे. त्यांनी यावर्षी कापूस आणि सोयाबीनची लागवड केली होती. मात्र, त्यांच्याही शेतीचे परतीच्या पावसाने नुकसान झाले आहे.