यवतमाळ- वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल असलेल्या 25 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. मात्र, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पुढील 14 दिवस त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे यांनी दिली. २५ जणांना आयसोलेशन वार्डमधून सोडण्यात आले असले तरी ते आरोग्य विभागाच्या निगराणीखाली राहणार आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आणखी 19 रिपोर्ट प्राप्त झाल्या असून त्या सर्व निगेटिव्ह आहेत, असे डॉ. मिलिंद कांबळे यांनी सांगितले. सोमवारी 31 जणांना सुट्टी देण्यात आली होती. दोन दिवसांत एकूण 56 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. या सर्वांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डमध्ये 131 जण भरती आहेत तर मागील 24 तासात दोन जण भरती झालेत. मंगळवारी तपासणीकरीता 32 जणांचे नमुने नागपूरला पाठविण्यात आले आहे. गृह विलगीकरणात एकूण 131 जण असून संस्थात्मक विलगीकरणाअंतर्गत अल्पसंख्यांक मुलींचे वसतिगृहात 34 जणांना ठेवले आहे.