यवतमाळ - बाजारपेठ बंद असल्याने शेतकरी आधीच संकटात सापडले आहेत. त्यांना दिलासा म्हणून शासनाने बाजार समिती सुरू करण्याचा निर्णय घेतला. नोंदणीसाठी मोबाईल क्रमांक देण्यात आला. मात्र, हा क्रमांक बंद असल्याने शेतकऱ्यांच्या बाजार समितीत रांगा लागल्या होत्या.
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव हे सर्वात मोठी कापसाची बाजारपेठ आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीमुळे शेतकऱ्यांचे पीक घरात आहे. त्यामुळे सरकारने कापूस विक्री त्वरित सुरू करावी, असे आदेश दिल्यावर बाजार समितीकडून नोंदणी सुरू केली आहे. परंतु, बाजार समितीकडून जो मोबाईल क्रमांक दिला ( 7263962162)आहे तो पण बंद दाखवत असल्याने शेवटी शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये झुंबड केल्याचे दिसून आले. कृषी उत्पन्न बाजार समितीपासून जवळपास एक किलोमीटर रांग शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी लावली होती. त्यामुळे कोरोनामुळे शेतकरी किती संकटात आहे दिसून येत आहे. त्यामुळे चांगले नियोजन करून कापूस खरेदी करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.