यवतमाळ - शहराला पाणी पुरवठा करणारे निळोणा धरण अजूनही पूर्ण भरले नसल्याने, यवतमाळकरांची चिंता वाढली आहे. मागील वर्षी यावेळी निळोणा धरण ओव्हरफ्लो झाले होते. मात्र, यावर्षी धरणात कमी पाऊस पडल्याने जलसाठा कमी आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास, यवतमाळकरांना येत्या उन्हाळ्यात कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागेल, अशी भीती आहे.
गतवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली होती. तर, जूनच्या शेवटच्या आठवड्यात शहराला पाणीपुरवठा करणारे निळोणा आणि चापडोह हे दोन्ही प्रकल्प पूर्णपणे भरून झाले होते. मात्र, यावर्षी जुलै महिना संपत आला तरी पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्याने, धरणाच्या पातळीत इंचभरही वाढ झालेली नाही.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून, निळोणा आणि चापडोह या प्रकल्पांमधून शहरातील साडेतीन लाख नागरिकांना पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. मात्र पावसाने हजेरी न लावल्याने हे प्रकल्प अद्यापही भरलेले नाही.
यावर्षी पावसाने चांगलीच उसंत घेतली असून, केवळ 24.20 टक्के पाऊस पडला आहे. दोन्ही धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध होण्यासाठी किमान 49 टक्के पावसाची आवश्यकता असते.