यवतमाळ - 'शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डात मुदतबाह्य झालेल्या औषधांचे वाटप करण्यात येत आहे, तर पिण्याचे पाण्याचीही सुविधा नसून वैद्यकीय अधिकारी तपासणीसाठी येत नाही', असे आरोप पुसद येथील एका रुग्णाने केला आहे. त्यामुळे पुन्हा आयसोलेशन वॉर्डातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या प्रकारानंतर जिल्हा रुग्णालयाने सारवासारव करणे सुरू केले आहे.
संबंधित रुग्णाने दोन दिवस औषध घेतल्यानंतर त्या औषधाची मुदत संपली असल्याचे लक्षात आले. त्यानंतर औषध बदलून मागितले, तर दुसरं औषध नसल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले. तसेच आयसोलेशन वॉर्डात पिण्याच्या पाण्याच्या बॅरलही आल्या नाही. आजसुद्धा तीच व्यथा आहे. सकाळपासून प्यायला पाणी नाही. रुग्णांना सॅनिटायझर, मास्क दिल्या जात नसल्याचा आरोप या रुग्णाने केला आहे. याच रुग्णाला 6 वाजता सलाईन देऊन गेलेले कर्मचारी सलाईन संपून 2 तास पूर्ण झाले तरी एकाही कर्मचाऱ्याने फिरकून पाहिले नाही, असाही तो तरुण या व्हिडिओमध्ये सांगत आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक तुरुंगतुषार वारे यांच्याशी संपर्क साधला असता डॉ. मरसकोल्हे यांना 10 मिनिटात पाठवितो असे सांगण्यात आले. मात्र, तेही तब्बल एका तासांनी पोहोचले. तसेच प्रशासन बाहेर मास्क न लावणाऱ्यावर दंड आकारत आहे. मात्र, इथे मरणयातना भोगणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांना मास्कही मिळत नसल्याचा आरोप त्या तरुणाने केला आहे.
जिल्हा रुग्णालय प्रशासनाने ही मुदत संपलेले औषध बदलून देण्यात आले असून पिण्याच्या पाण्याची कुठेही कमतरता नाही. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून नियमित रुग्णांची तपासणी करण्यात येत असल्याचे अधिष्ठाता आर. पी. सिंह यांनी सांगितले.