यवतमाळ - भाजप सरकार विरोधात काँग्रेसच्या महापर्दाफाश यात्रेचा दुसरा टप्पा यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातून सुरू झाला. सरकारच्या सर्व योजना आणि आश्वासने फसवे असल्याचा आरोप महापर्दाफाश यात्रेचे प्रमुख नाना पटोले यांनी केला.
सरकारने एकही योजना पूर्ण केली नाही म्हणूनच ही महापर्दाफाश यात्रा काढावी लागली. महाराष्ट्र सरकारने कर्जमाफी, बेरोजगारी याबाबत जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण केलेले नाहीत. हे सरकार लबाडांचे आहे. महाजनादेश यात्रा काढून जनतेच्या कष्टाचा पैसा खर्च करत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांनी आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांच्यावर निशाणा साधला. बाभूळगाव तालुक्यातील एक प्रकल्प 2006 मध्ये आघाडी सरकारने मंजूर केला होता. मात्र, तो प्रकल्प या सरकारने रद्द केला. ही बाब आपल्या मतदारसंघातील मंत्री अशोक उईके यांना माहीत नाही, ही शोकांतिका आहे. हेच मंत्री महोदय गेल्या वीस वर्षांत जे झाले नाही ते मी पाच वर्षांत केले, असे सांगत फिरत आहेत.
हेही वाचा - कृष्णा पाणी वाटप; आंध्र, तेलंगणाच्या मागणीला महाराष्ट्र, कर्नाटकचा विरोध
भाजपमध्ये फक्त मार्केटिंग करणारे लोक आहेत. आपण त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. विरोधी पक्षातील लोकांनी पक्षात यावे यासाठी 'ईडी' आणि 'सीबीआय'च्या चौकशा मागे लावण्यात येत आहेत, असे खासदार बाळू धानोरकर यांनी म्हटले.
यावेळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आमदार यशोमती ठाकूर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, हरिभाऊ राठोड, संध्याताई सवालाखे, गिरीश बांदे, जीवन पाटील, देवानंद पवार, प्रवीण देशमुख, संध्याताई इंगोले, प्रफुल्ल मानकर, नंदिनी धरणे, अतुल राऊत, भैय्यासाहेब देशमुख हे उपस्थित होते.