यवतमाळ - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळा, गर्दी करू नका, अशा सूचना प्रशासनाकडून वारंवार जात आहेत. मात्र, तरी शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात या नियमांचे पालन केले गेले नाही. त्यामुळे याठिकाणी कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे.
शहरातील इंदिरानगर, पवारपुरा, मेमन कॉलनी यासह त्या भागातील 30 वर अशी ही प्रतिबंधित क्षेत्र आहेत. त्यात याच भागांमध्ये राहणारी काही मंडळी पाण्यासाठी हॅण्डपम्पवर गर्दी करीत होते. शिवाय याच भागातील एक कोरोना पॉझिटिव्ह महिला स्वयंपाकी होती. तिच्या संपर्कात 23 लोक आल्याने ते कोरोना पॉझिटिव्ह झाले. तर संचारबंदी काळातही पानसुपारी, खर्रा विक्रीची दुकाने प्रशासनाने बंद केली होती. मात्र, एका व्यक्तीने पान, सुपारी आणि खर्रा याची विक्री केली. त्याच्या संपर्कात 7 व्यक्ती आले. आणि त्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.
शहरात कोरोनाबाधितांची संख्या तब्बल 69 झाली आहे. यवतमाळच्या प्रतिबंधित क्षेत्रात बहुतांश लोकांची घर दाटीवाटीची आहेत. त्यात काही व्यक्ती आणि कुटुंबीय पॉझिटिव्ह रुग्णांच्या थेट संपर्कात आले. त्यामुळे या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली. प्रशासनाकडून सुरुवातीपासून आतापर्यंत 1021 व्यक्तीचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. यातील अजूनही काही व्यक्तीचे रिपोर्ट येणे बाकी आहे. शहरात त्यानुसार इतर भागात कोरोना विषाणूचा संसर्ग नागरिकांना होऊ नये, यासाठी शासनाच्या वतीने सोमवारी यवतमाळमध्ये प्रतिबंधित क्षेत्राचा परीघ वाढविला आहे.
हेही वाचा - औरंगाबादेत आज ३० रुग्णांची भर, कोरोनाबाधितांचा आकडा ८३ वर
पोलीस अधीक्षक यांनी प्रस्तावित केल्यानुसार चापनवाडी, तारपूरा, शिंदेनगर, आठवडी बाजार, अलकबीर नगर, विदर्भ हाऊसिंग सोसायटी, शुभंकर रोड, सुदर्शन नगर या भागास प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. मात्र, काहीच दिवसात कोरोना बाधितांची संख्या दुपटीने वाढली आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळले नाही, गर्दी टाळली नाही आणि नियमांचे पालन केले नाही तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागण्याची शक्यता आहे.