यवतमाळ - मुक्त विद्यापीठात शिक्षण घेतलेल्या एका शेतकरी पुत्राने चक्क इंग्लंडमधील जवळपास 45 लाखांची स्कॉलरशिप मिळवली आहे. राजू केंद्रे असे या शेतकरी पुत्राचे नाव असून त्यांनी इंग्लंडमधील प्रतिष्ठित 'चेवनिंग' ही स्कॉलरशिप मिळवली आहे. ईटीव्ही भारत प्रतिनिधीने राजू केंद्रेशी संवाद साधला. यावेळी या तरुणाने आपल्या जीवनातील संघर्ष ते आतापर्यंतचा प्रवास याबाबत सांगितले.
तुझी जर चेवनिंग या स्कॉलरशिपसाठी निवड झाली नाही तर काय करशील? यावर उत्तर देताना राजू केंद्रे म्हणाला, माझी निवड नाही झाली तरी पुढच्या दहा वर्षात दहा एकलव्यची चेवनिंग स्कॉलरशिपसाठी पात्र करून दाखवणार, असे उत्तर दिले. जगभरातील 160 देशातील दीड हजार विद्यार्थ्यांमध्ये राजू आत्माराम केंद्रे या शेतकरी पुत्राची इंग्लंडमधील जागतिक स्तरावरील नेतृत्व विकासासाठी दिल्या जाणाऱ्या चेवनिंग स्कॉलरशिपसाठी निवड झाली. तो मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील पिंपरी( खंदारे) या गावचा आहे. तर मागील चार वर्षांपासून यवतमाळच त्याची कर्मभूमी बनली आहे. राजू केंद्रेचा लोणार ते लंडन व्हाया यवतमाळ हा प्रवास संघर्षातून पुढे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.
पुणे रिटर्न ते लंडन प्रवास -
ग्रामीण भागातील राजू केंद्रे हा विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिक्षण घेतल्यानंतर बुलढाणा येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. त्यानंतर अधिकारी बनायचे स्वप्न उराशी स्वप्न बाळगून तो पुणे येथे गेला. मात्र, परिस्थितीशी हार मानत त्याला अर्धवट शिक्षण सोडून द्यावे लागले. यानंतर मुक्त विद्यापीठातून त्याने आपले शिक्षण सुरू ठेवले. याचदरम्यान मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेत उपेक्षित वर्गातील मुलांसाठी एकलव्य या नावाने अकॅडमी सुरू केली. यातून चांगल्या विद्यापीठात विद्यार्थ्यांना कसे शिक्षण घेता येईल याचे मार्गदर्शन देणे सुरू केले. दहा वर्षाच्या संघर्षानंतर दिवस-रात्र घेतलेल्या परिश्रमाला फळ आले आणि पुणे रिटर्न म्हणून हिणवल्या जाणाऱ्या विद्यार्थ्याची निवड थेट इंग्लंडमधील विद्यापीठात उच्चशिक्षणासाठी करण्यात आली.
हेही वाचा - सिरिशा बांडला ठरणार अंतराळात जाणारी दुसरी भारतीय वंशाची महिला
अशी आहे चेवनिंग स्कॉलरशिप -
फॉरेन कॉमनवेल्थ विभागाच्यावतीने दिली जाणारी चेवनिंग स्कॉलरशिप ब्रिटिश सरकारच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रमातील महत्त्वाची आणि मानाची समजली जाते. ही स्कॉलरशिप जवळपास 45 लाखांची असून इंग्लंडमध्ये शिकायला जाणारा सर्व खर्च यातून केला जातो. शिवाय येथील विकासात्मक कार्यातील कार्यक्रमात सहभागी करून घेतात. या शिष्यवृत्तीसाठी जगातील 160 देशांमधील 63 हजार अर्ज आले होते. यातील पाच हजार विद्यार्थ्यांनी दोन फेऱ्यानंतर मुख्य मुलाखत दिली. त्यातून दीड हजार विद्यार्थ्यांची या स्कॉलरशिपसाठी अंतिम निवड झाली.
यवतमाळ झाली कर्मभूमी -
मुख्यमंत्री फेलोशिपमध्ये राजू केंद्रे यांनी जिल्ह्यातील नेते पारधी पदावर काम केले. याठिकाणी पारधी समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मोठे योगदान आहेत. शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी हाताळले. यातूनच यवतमाळ येथील सावित्री ज्योतिराव फुले समाजकार्य महाविद्यालयात अतिथी प्राध्यापक म्हणूनही काम सुरू होते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अडगळीतील पुस्तके संकलन करून ती गरजू विद्यार्थ्यांना देण्याचा उपक्रमही या विद्यार्थ्यांना उपयोगी पडला आहे.
एक वर्षापासून केली या स्कॉलरशिपसाठी तयारी -
चेवनिंग स्कॉलरशिप मिळवणारा हा ग्रामीण भागातील पदवीपर्यंत मराठी माध्यमातून आणि पदवीनंतर मुक्त विद्यापीठातून शिकलेला भटक्या प्रवर्गातील हा एकमेव विद्यार्थी असावा. त्यांनी मागील एक वर्षापासून या स्कॉलरशिपसाठी तयारी सुरू केली होती. आजपर्यंत तो जागतिक स्तरावरील 18 विद्यापीठांच्या मास्टर अभ्यासक्रमासाठी पात्र ठरला होता. यातील बहुतांश विद्यापीठ आंतरराष्ट्रीय नामांकनानुसार पहिल्या 200मधील आणि नऊ विद्यापीठे पहिला 100मधील होते. या विद्यापीठात मास्टरचे शिक्षण पूर्ण करायला वर्षाला जवळपास 40 ते 50 लाख रुपये खर्च लागतात. या शिष्यवृत्तीमुळे राजू केंद्रे याला इंग्लंडमधील विद्यापीठात आता शिक्षण घेता येणार आहे.
इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार -
इंग्लंडमध्ये शिक्षण घेऊन परतल्यानंतर आपल्यासारख्या अभावाने जगणाऱ्या आणि शैक्षणिक संधी नसणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा स्कॉलरशिपच्या माध्यमातून परदेशात शिक्षणासाठी पाठवण्याचा निश्चय त्याने केला आहे. यासाठी महाराष्ट्रात एकलव्य अकॅडमीचे किमान पाच ते सात केंद्र उभारणार असल्याचेही ई-टीव्ही भारतशी बोलताना त्यांनी सांगितले.