यवतमाळ - नेर तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे उमरठा, सातेफळ, आडगाव, महाजनपूर आणि शिरजगाव या गावातील 250 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर उमरठा, शिरजगाव, पांढरी, परगणा या गावांमध्ये 15 मिनिटातच वादळी वाऱ्याने तांडव घातले. या वादळात घरावरील व गोठ्यांवरील टीनपत्रे पतंगासारखे उडून गेली.
अचानक आलेल्या पावसामुळे शेतातील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. कपाशीला लागलेली बोंडेही गळून पडली. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनात प्रचंड घट सहन करावी लागणार आहे. सोयाबीन पिकाचा तर काढणीचा खर्च देखील परवडणारा नसेल. अगोदरच ग्रामीण अर्थव्यवस्था कोरोना प्रादुर्भावामुळे खिळखिळी झाली आहे. त्यात आता वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या नुकसानीत भर घातली.
यावर्षी सुरुवातीपासूनच चांगला पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची पिके जोमात होती. प्रत्येक कपाशीच्या झाडाला 40 ते 50 बोंडे लागलेली होती. मात्र, पावसामुळे कपाशी, सोयाबीन आणि तूर ही पिके पूर्णतः आडवी झाली. या शेतकऱ्यांनी नुकसानीचे तातडीने पंचनामेकरून नुकसान भरपाई देण्यात, यावी अशी मागणी शासनाकडे केली आहे.