यवतमाळ - यावर्षी खरीप हंगामात नगदी पीक असलेल्या कपासीची यवतमाळ जिल्ह्यात सुमारे पाच लाख हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. या पिकावर शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन अवलंबून असते. मात्र, पिकाने बहरावं आणि रोगांनीही त्यासोबत बहरावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करत, पैशांची अडी-अडचण असतानाही लागेल तो खर्च या पिकांवर केला आहे. मात्र, त्यावर आता गुलाबी बोंड अळीने आक्रमन केले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आपले पिक चांगले आले आहे, याचे समाधान असतानाच, आता या बोंड अळीच्या प्रादुर्भावाने चिंता वाढवली आहे. दरम्यान, या रोगाच्या प्रादुर्भावानंतर जिल्ह्यातील काही कृषी तज्ञांनी योग्य सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे. याबाबतचा वाचकांसाठी ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट-
'एकरी 10 फेरोमन ट्रॅप शेतात लावावे'
गुलाबी बोंड अळीचे पतंग आहेत का? हे शोधण्यासाठी फेरोमन ट्रॅप शेतात एकरी 9 ते 10 पर्यंत लावणे आवश्यक आहे. अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाला आणि कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ यांना येत असून, अनेक ठिकाणी शेतात कृषी अधिकारी शेतात जाऊन पाहणी करीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि सल्ला देत आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी कपाशीच्या शेतात अर्धवट उमललेले फुल आहेत, अशा डोमकळ्यामध्ये गुलाबी बोंडअळी दिसून आली आहे. अशा कळ्या तोडून धुऱ्यावर फेकण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. सध्या पीक 55 ते 60 दिवसाच्या कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यासाठी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. आता पीक फुलाच्या अवस्थेत आहे. अशावेळी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. अन्यथा विदारक परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा खबरदारीचा इशाराही यावेळी तज्ञांनी दिला आहे.
'अनावश्यक खतांचा वापर टाळावा'
कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मृद परीक्षणाच्या आधारावर खतमात्रेचा अवलंब करावा. नत्रयुक्त खतांचा अवाजवी वापर टाळावा. जेणेकरून पिकाची अनावश्यक वाढ होणार नाही. व पिक दाटणार नाही याची काळजी घ्यावी. शेतात पक्षी थांबे उभारावेत. ज्यामुळे पक्षी बसून अळ्या-किडी टिपून खातील. फुले व बोंडे लागण्याच्या कालावधीत मोठ्या संख्येने नर पतंग जेरबंद करण्यासाठी प्रती एकर 10 ते 12 कामगंध सापळे लावावे. सापळ्यात अडकलेले पतंग वेळेच्या वेळी नष्ट करावेत. शेतात प्रकाश सापळे लावावे बोंडअळीची अंडी किवा प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या पिकावर दिसू लागताच शेवटचा उपाय म्हणून किटकनाशकचा वापर करावा. असे करताना वेगवेगळ्या किटकनाशकांना एकत्रित करून फवारणी करू नये, असेही कीटक शात्रज्ञ शेतकऱ्यांना सांगत आहेत. तसेच, फवारणी करताना अंगरक्षक कपड्यांचा वापर करावा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.
बांधावर जाऊन कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
शेतकऱ्यांना बोंड अळीचा मागील काही वर्षापासून जो त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे नवीन संशोधन करून नवीन कापूस वाण शेतकऱ्यांना देण्यात यावे, अशीही मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे. गुलाबी बोंडअळीचा प्राथमिक स्वरुपाचा प्रादुर्भाव दिसताच निंबोळी अर्क 5% या वनस्पतीजन्य किटकनाशकाची फवारणी करावी. रासायनिक किटकनाशकांचा वापर शेवटचा पर्याय म्हणून करावा. शिवाय असे करतांना लेबलक्लेम शिफारशीत किटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच, फवारणी करताना अंगरक्षक कपडे, चष्मा, हातमौजे, टोपी, मास्क वापरूनच फवारणी करावी. असेही कृषी अधिकारी शेतकऱ्यांना बांधावर जाऊन सांगत आहेत.
'दक्षता घेतल्यास त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य'
अशा रोगाच्या प्रादुर्भावावेळी शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, साधारण मान्सूनपूर्व कापसाची लागवड करणाऱ्या शेत शिवारात गुलाबी बोंड अळी पाहायला मिळत आहे. सध्या अळीचा प्रकोप नुकसानीच्या पातळीखाली आहे. मात्र, वेळीच दक्षता घेतल्यास त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता सजग राहण्याचे आवाहनही कृषी विभागाने यावेळी केले आहे.
हेही वाचा - अहमदनगर : उसाच्या बालेकिल्ल्यात आता केळी पिकाचे आक्रमण