यवतमाळ - कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यात पाण्याच्या विसर्गामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यास सांगली, कोल्हापुरातील पूरपरिस्थिती नियंत्रणात येऊ शकते. तसेच कोयनेचा विसर्ग कमी करण्यासंबंधी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी पत्राद्वारे विनंती केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेनिमित्त यवतमाळमध्ये आले होते. यावेळी ते बोलत होते.
सांगली आणि कोल्हापूर पूरपरिस्थितीवर तत्काळ उपाययोजना करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यातील इतर भागातील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यावर लक्ष देऊन असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
गेल्या आठवड्याभरापासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली या भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूरमधील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. धोक्याची पातळी ५२ फूटवर गेली आहे. त्यामुळे शिरोळमधील गावे, कोल्हापूर शहर आणि हातकणंगले तालुक्यातील गावे तसेच चिखली आणि आंबेवाडी परिसर प्रभावित झाला आहे. यासाठी एनडीआरएफची दोन पथके पाठवण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
पूरग्रस्त भागात वेळ पडल्यास हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून मदतकार्य राबवण्यात येईल. आतापर्यंत १५०० कुटुंबांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. नौदलाच्या साहाय्याने मदतकार्य सुरू आहे. तसेच सांगलीमध्ये पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एनडीआरएफचे पथक पाठवण्यात आले आहे. राज्याचे मुख्य सचिव या भागावर लक्ष देऊन आहे. यासंदर्भात बुधवारी आढावा बैठक घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, पालकमंत्री मदन येरावार, गृहराज्यमंत्री राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, आमदार निलय नाईक, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार उपस्थित होते.