यवतमाळ - परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन आणि कपाशी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे, ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
भाजपच्या वतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वारंवार आंदोलने निदर्शने करण्यात आली. मात्र, याची कुठलीच दखल घेण्यात आली नाही. चार दिवसापूर्वी काँग्रेस पक्षाच्यावतीने भूमिपूजन कार्यक्रम, कार्यकर्ता मेळावा आणि मशाल मोर्चा यासाठी राज्यातील काँग्रेसचे बडे मंत्री दाखल झाले होते. मात्र, त्यांनी देखील शेतकऱ्यांचे सांत्वन केले नाही. त्यामुळे, महाविकास आघाडी सरकारचे मंत्री शेतकऱ्यांप्रति किती उदासीन आहेत, हे दिसून येते.
कुठलेच पंचनामे झाले नाहीत
जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तरी आजपर्यंत कुठल्याच प्रकारचे पंचनामे झाले नाहीत. केवळ अतिवृष्टीचे पंचनामे करण्यात आले. याचीही तोकडी मदत जाहीर करण्यात आली. कपाशीवर बोंडअळीने हल्ला केला आहे. त्यामुळे, या नुकसानीचे देखील पंचनामे तातडीने करण्यात यावे आणि सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच, ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी भाजपच्या वतीने निवेदनातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली.
हेही वाचा- कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव, शेतकऱ्याने पिकावर फिरवला नांगर