यवतमाळ - ज्यांनी 30 वर्षे सत्ता भोगली. विविध राजकीय पदे उपभोगली आणि आता भाजप सत्तेवर असल्याने, आपल्या मागे चौकशी लागेल यासाठी पक्षांतर करत आहेत, अशा राजकीय भामट्यांना राजकारणातून हद्दपार केले पाहिजे. मतदारांनी त्यांना 'मत नव्हे लाथा मारल्या पाहिजे, अशी भूमिका प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी 'ईटीव्ही'शी बोलताना मांडली.
हेही वाचा - नवरात्री विशेष : उमरखेड शहरातील जाज्वल्य शक्तिपीठ रेणुकामाता
विकासाच्या नावावर पक्षांतर करणाऱ्यांची 'खुर्ची'साठी धावपळ -
यावेळी कडू म्हणाले, ज्या पक्षाने तुम्हाला मोठे केले. त्या पक्षाच्या माध्यमातून लोकांचा विश्वास ज्यांनी जिंकला. त्याला लाथ मारून तेच नेते आता विकासाचे सुंदर नाव घेऊन पक्षांतर करून खुर्चीसाठी धावपळ करत आहेत. खरेतर हा राजकारणातील भामटेपणा मतदारांनी हद्दपार केला पाहिजे.
सुडबुद्धीने 'ईडी'ची शरद पवारांवर कारवाई -
'ईडी'ने (सक्त वसुली संचालनालय) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कारवाईचे शस्त्र उगारले. मात्र, ते पुन्हा बंद करण्यात आले. यावर बोलताना आमदार बच्चू कडू यांनी हा सत्तेचा गैरवापर आहे. ज्या वेळेस भाजपची सत्ता जाणार होती, त्यावेळी राष्ट्रवादीने भाजपला सहकार्य केले. त्यामुळे 3 साडेतीन वर्षात काही झाले नाही. मात्र, शरद पवार पुन्हा ताकतीने पुढे येत असल्याचे दिसताच भाजपने 'ईडी' ची खेळी केली आहे.
हेही वाचा - यवतमाळमध्ये बालाजी दुर्गा उत्सव मंडळाने साकारली 'वैष्णोदेवी धाम'ची प्रतिकृती
40 मतदारसंघात प्रहार विधानसभेच्या आखाड्यात -
निवडणुकीच्या अनुषंगाने प्रहार पक्षाकडून उमेदवारी लढण्यासंदर्भात बोलताना, कुठल्याही राजकीय नेत्यांची निष्ठा ही पक्षावर नाहीतर लोकांवर असली पाहिजे. मतदार हेच देव ठरले पाहिजे त्यामुळे आम्ही कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता ही लढाई लढणार आहोत. महाराष्ट्रात जवळपास 40 मतदारसंघात प्रहार जनशक्ती पक्षाकडून उमेदवार उभे करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.