यवतमाळ- कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. भारतातही दिवसागणिक कोरोनाचे नव्याने रुग्ण समोर येत आहेत. कोरोनाबाबत नागरिकांनी खबरदारी घेण्यासाठी शासनस्तरावर अनेक प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाबाबात खबरदारीसाठी जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यातील पुरद जवळील पार्डी गावातील छाया पठाडे या मोलमजुरी करणाऱ्या महिलेनेही कोरोनाविषयी जनजागृती करणारे गाणे गायले आहे.
छाया या पार्डी गावातील शेतात मजुरीकरुन आपला संसारगाडा हाकतात. छाया या निरक्षर आहेत. मात्र त्यांना आजही शेकडो गाणी मुखोद्गत आहेत. कोणत्याही संगीत विद्यालयात त्यांनी गायनाचे धडे घेतले नाहीत. गाण्याचा वारसा वडिलांकडून त्यांना मिळाला आहे. पारंपरिक लोकगीतासोबत, पाळणागीते तथा गौळणही त्या अगदी लयीत गातात. शेतावर काम करताना काळ्या आईच्या साक्षीने त्या आपल्या गाण्यांचा सराव करतात.
कोरोनाविषयी जणजागृही करणारे गाणेही त्यांनी गायले आहे. यातून त्या कोरोनाविषयी घेण्यात येणारी खबरदारी, फिजिकल डिस्टन्स, याबाब लोकांना जागृत करतात. छाया यांना जन्मजातच गोड गळा लाभला असून त्या गाणे तालासुरात गातात.