यवतमाळ : दिवाळी दोन दिवसांवर आली असताना अद्यापही शासनाकडून कुठलीच मदत मिळाली नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत देण्याची मागणीसाठी शेतकऱ्याने स्वतःला आपल्या शेत मातीत गाडून घेऊन अभिनव आंदोलन केले आहे. मोरेश्वर वातीले असं या आंदोलनकर्त्या शेतकऱ्याचं नाव आहे. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील जरुर येथे हे अभिनव आंदोलन करण्यात आले.
चुकीच्या आणेवरीचा फटका
सततचा पाऊस आणि बोगस बियाण्यामुळे खरिप हंगामातील कापूस व सोयाबीन पीकाचे मोठे नुकसान झाले आहेत. सोयाबीनच्या शेंगा या भरल्या नसल्यामुळे उत्पादन झाले नाही. त्यामुळे उभ्या पीकात रोटावेटर आणि आग लावण्याच्या घटना समोर आल्या आहे. असे असतांना स्थानिक प्रशासनाकडून चुकीची आणेवारी काढल्या गेल्याने घाटंजी तालुका शासकीय मदतीपासून वगळला गेला. याच्या निषेधार्थ जरुर येथील शेतकरी मोरेश्वर वातीले यांनी आपल्या शेतातील मातीत स्वतःला गाडून घेऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
अधिकाऱ्यावर कारवाई करा
महसूल व कृषी विभागाने चुकीच्या पद्धतीने पैसेवारी काढली त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळावी, चुकीची पैसेवारी काढणा-या संबधितांवर बडतर्फीची कारवाई करावी, तसेच पीकविमा शतप्रतिशत शेतक-यांच्या खात्यात जमा करावा, सीसीआईची कापूस खरेदी सुरू करावी या मागण्या यावेळी करण्यात आल्या आहे.
हेही वाचा - अयोध्या दीपोत्सव! अयोध्येत 5 लाख 51 हजार दिवे उजळणार