यवतमाळ - उमरखेड नगरपालिकेच्या प्रांगणामधील चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला. ही घटना आज सांयकाळच्या सुमारास घडली. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी आणि मालमत्तेची हानी टळली. या घटनेनंतर मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांनी पालिकेच्या मालकीची वाहने सोडून प्रांगणात लावण्यात येणाऱ्या इतर सर्व वाहनांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.
नगरपालिकेच्या प्रांगणाला लागूनच पेट्रोल पंप आहे. या आगीने जर पेट्रोल पंपाला वेढले असते, तर उमरखेड शहराचे व नगरपालिकेच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असते. नगरपालिकेचे प्रांगण हे मागील पाच वर्षापासून सत्ताधाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या गाड्यांचे अनाधिकृत पार्किंग झोन बनले असल्याचा आरोप सामान्य नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे, नगर पालिकेच्या मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांनी ठोस उपाययोजना करावी. जेणेकरून पुन्हा अशी घटना घडू नये, अशी मागणी नागरिक करत आहेत.
हेही वाचा - यवतमाळ : पीपीई किट घालून बजावला मतदानाचा हक्क