यवतमाळ - यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ७ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातमध्ये आता २४ उमेदवार उभे असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली.
यवतमाळ-वाशिम लोकसभेच्या रिंगणामध्ये एकूण ३७ उमेदवारांनी ५१ नामनिर्देशन पत्र सादर केले होते. यामध्ये ७ नामनिर्देशनपत्र अवैद्य ठरविण्यात आले. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ७ उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे आता २४ उमेदवार हे लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. या २४ उमेदवारांमध्ये काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे, शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार भावना गवळी, बहुजन समाजवादी पार्टीकडून अरुण किनवटकर, प्रहार जनशक्ती पक्षाकडून वैशाली येडे, वंचित बहुजन आघाडीकडून प्रा. प्रवीण पवार, भाजपचे बंडखोर उमेदवार पी.बी. आडे हे प्रमुख उमेदवार आहेत.
या निवडणुकीमध्ये ३ राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षाचे उमेदवार, ७ नोंदणीकृत राजकीय पक्षाचे उमेदवार तर १४ अपक्ष उमेदवार असे एकूण २४ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. शुक्रवारी दुपारी अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. या निवडणुकीसाठी २ हजार १८१ मतदान केंद्रे असून १९ लाख १४ हजार ७८५ मतदार आहेत. आचारसंहितेचा भंग होऊ नये, म्हणून निवडणूक विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून ३ हजार ८१६ पोस्टर, १ हजार ७४८ बॅनर, २५० भिंतीवरील लिखाण, इतर कारवाई १९९ अशा एकूण ६ हजार १३ कारवाया करण्यात आल्या आहेत.
निवडणुकीच्या रिंगणात २४ उमेदवार असल्याने दोन बॅलेट युनिटचा वापर या मतदार केंद्रावर करण्यात येणार आहे. एका बॅलेट युनिटवर १६ उमेदवार तर दुसऱ्याला बलेट युनिटवर ८ उमेदवार आणि एक नोटा यांचा समावेश राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.