वाशिम- कोरोनाच्या महामारीमुळे सर्वत्र हाहाकार माजला असून,अनेकांचे रोजगार गेले आहेत. परजिल्ह्यातून गावी परतलेल्या महिला मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून वाशिम शहरातील गुरू माऊली संस्थेने पुढे येत 25 महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. संस्थेने सुरुवातीला मास्क बनवण्याचे काम केले. राखीपोर्णिमा सणासाठी लागणाऱ्या राख्या बनवण्याचे काम सुरू आहे. घरबसल्या या महिलांना रोजगार मिळत असल्याने या महिलांनी समाधान व्यक्त केले आहे.
गुरु माऊली संस्थेच्या महिलांनी आतापर्यंत चार ते पाच हजार राख्यांची निर्मिती करून विक्री केली आहे. 10 हजार राख्या बनवण्याची त्यांना ऑर्डर मिळाली आहे.
गुरू माऊली संस्थेमधील काम करणाऱ्या महिलांनी मास्क, ओपीडी गाऊन व कपड्या पासून ओपीडी किट तयार करून त्याची विक्री केली होती. त्यामधून या संस्थेला चांगले उत्पन्न मिळाले होते.
गुरू माऊली संस्थेने महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमी काम केले आहे. कोरोनाच्या संकटात गरजू महिलांना प्रशिक्षण देऊन आम्ही मास्क,राख्या बनविणे सुरू केले आहे. यापुढे गौरी, गणपती सजावटीसाठी साहित्य तयार करणार असल्याचे समूहाच्या अध्यक्षा गावंडे यांनी सांगितले.