वाशिम - जिल्ह्यातील करंजी येथील करूणेश्वर संस्थानच्या एका हॉलमध्ये ठेवलेल्या मंडप साहित्याला अचानक आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. ही आगीची घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, ही आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जळालेले मंडप साहित्य सुरेश दामोधर कठाळे यांच्या मालकीचे होते. सुरेश कठाळे यांनी करूणेश्वर संस्थानमध्ये १० मे रोजी आयोजित लग्नाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर त्याच ठिकाणच्या एका हॉलमध्ये सर्व साहित्य ठेवले होते. आज ११ वाजण्याच्या सुमारास त्या मंडपाच्या साहित्याला आग लागली. तेव्हा स्थानिकांनी ती आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना अपयश आले.
या आगीत कठाळे यांनी ठेवलेले संपूर्ण साहित्य जळाले. या घटनेत मंडप कपडा, १०० गाद्या, १०० चटई यासह लाकडी साहित्य जळाले असल्याचे कठाळे यांनी सांगितले. मात्र, ही आग नेमकी कोणत्या कारणाने लागली. हे अद्याप अस्पष्ट आहे.