वाशिम - मागील तीन वर्षांपासून सततची नापिकीमुळे शेतकरी हैराण झाला आहे. मागील सरकारने कर्जमाफी करणार असल्याचे सांगितले, पण ती झाली नाही. आता नव्याने महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई हेक्टरी 25 हजार रुपये देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, अजून मिळाली नाही. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील कोळगाव येथील विजय शेंडगे या शेतकरी पुत्राने आपल्या शेतात फलक लावून चक्क आपले कुटुंब विक्रीला काढले आहे. 'माझा परिवार विकत घ्या मात्र, माझी शेती वाचावा' अशी आर्त याचना फलक लावून सरकारला केली आहे.
हेही वाचा - #FASTAG : फास्टॅग वापराबाबत वाहनधारकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया
शेतकरी पुत्र विजय शेंडगे हे मालेगाव तालुक्यातील कोळगाव येथील रहिवासी आहेत. त्यांच्या आजोबांच्या नावावर् सात एकर कोरडवाहू शेती आहे. या शेतीवर चार लाख 50 हजार रुपये कर्ज आहे. मागील तीन वर्षांपासून दुष्काळ आहे. या परिस्थितीत पीक विमा भरूनही अद्याप मदत मिळाली नाही. त्यामुळे हाताश होऊन शेती जगवण्यासाठी परिवार विक्रीला काढला असल्याचे विजय शेंडगे यांनी सांगितले.
अधिवेशनात हे सरकार शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावतील असे वाटत असताना, या सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून जगावं कसे या चिंतेत आम्ही परिवार विक्रीला काढला असल्याचे विजय यांनी सांगितले.
हेही वाचा - नाशिक : दिंडोरी येथे डॉक्टराची विषारी औषध घेऊन आत्महत्या
सततच्या नापिकीने आलेला कर्जबाजारीपणा, त्यामुळे जीवन जगणे कठिण झाल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यातच राज्यात सर्वत्र झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे सर्वच पीक वाहून गेल्याने प्रपंचाचा गाडा कसा चालवावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे सरकारने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.