वाशिम- मंगळवारी जिल्ह्यात ३८ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून यापैकी २१ अहवाल निगेटिव्ह आहेत. उर्वरित १७ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये वाशिम शहरातील १४, मंगरूळपीरमधील २ व्यक्तींचा व कारंजा लाड शहरातील एका व्यक्तीचा समावेश आहे. हे सर्वजण यापूर्वीच्या बाधितांच्या संपर्कातील आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४७ वर पोहोचली
वाशिम शहरातील गवळीपुरा परिसरातील १८ वर्षीय युवक, ११ वर्षीय मुलगा, २०, ३० व ३८ वर्षीय महिला, १४ व १६ वर्षीय युवती, तसेच गंगू प्लॉट परिसरातील ३५ व ४४ वर्षीय व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
मंगरुळपीर येथील संभाजी नगर परिसरातील ३४ वर्षीय व्यक्ती व मदार तकिया, माळीपुरा परिसरातील ६६ वर्षीय व्यक्तीला कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
वाशिम शहरातील हकीम अली नगर परिसरातील ६५ व ३३ वर्षीय पुरुष, २५ व ६० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्वजण अकोला येथे उपचार घेत असलेल्या बाधिताच्या नजीकच्या संपर्कातील आहेत. तसेच, 'सारी'ची लक्षणे असलेला कुंभारपुरा परिसरातील ६९ वर्षीय पुरुष कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, कारंजा लाड शहरातील आनंद नगर येथील 'सारी'ची तीव्र लक्षणे असलेला ६६ वर्षीय व्यक्ती ४ जुलै रोजी कारंजा लाड येथे उपचारासाठी दाखल झाला होता. त्याच दिवशी त्याला वाशिम येथे जिल्हा कोविड रुग्णालयात शिफ्ट करून उपचार सुरू करण्यात आले. तसेच ५ जुलै रोजी त्याच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान ६ जुलै रोजी रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री त्या व्यक्तीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.
वाशिम जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४७ वर पोहोचली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. ९७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय.