वाशिम - दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संभाजी ब्रिगेड मैदानात उतरली आहे. आज संभाजी ब्रिगेडच्यावतीने वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
केंद्र सरकारने पावसाळी अधिवेशनात तीन कृषी विधेयकांचे कायद्यात रुपांतर करून घेतले. या तिन्ही कायद्यांना देशभरातून जोरदार विरोध होत आहे. गेल्या १२ दिवसांपासून दिल्लीच्या सिंघू सीमेवर पंजाब-हरियाणातील शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांना आता देशभरातील शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला संभाजी ब्रिगेडनेही पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत संभाजी ब्रिगेड या शेतकऱ्यांचे सोबत असल्याचेही संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
काय आहेत कृषी कायदे?
केंद्र सरकारने जूनमध्ये जारी केलेल्या अध्यादेशांना कायदेशीर मंजुरी देण्यासाठी लोकसभेत तीन विधेयके पारित केली गेली. कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केल्याने तिन्ही विधेयकांचे कायद्यात रुपांतर झाले आहे. ही विधेयके शेतकरी हिताची असल्याचे सरकारने म्हटले आहे. या तीन कृषी विधेयकांपैकी पहिले विधेयक म्हणजे शेतकऱ्याला देशात कोणत्याही ठिकाणी त्याचे पीक विकण्याचे स्वातंत्र्य. दुसरे विधेयक म्हणजे व्यापाऱ्यासोबत शेतकर्यांने केलेल्या आगाऊ कराराला कायदेशीर मान्यता. तिसरे विधेयक म्हणजे - डाळी, तेल बियाणे यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यावरील निर्बंध दूर करणे.
उद्या भारत बंद -
केंद्र सरकारने आणलेल्या कृषी व पणन कायद्याला संपूर्ण देशभरातून तीव्र विरोध होत आहे. या कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. यासाठी ८ डिसेंबर रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला आम आदमी पार्टी, तेलंगणा राष्ट्र समिती आणि महाविकास आघाडीनेही पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे दिल्ली, तेलंगणा आणि महाराष्ट्रात हा बंद मोठ्या प्रमाणात यशस्वी होण्याची चिन्हे आहे. यासोबतच काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी, बसपा, पीएजीडी, एसीपी, सीपीआय, राष्ट्रीय लोकशाही पार्टी, डीएमके, आरजेडी, जेएमएम, आरएसपी या पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे. तृणमुल काँग्रेस, कमल हासन यांच्या मक्काल निधि मय्यम या पक्षांनी देखील पाठिंबा दर्शवला असून उद्याचा बंद य़शस्वी करण्यासाठी कार्यकर्ते काम करतील.