वाशिम - शेतकरी आणि गोरगरिबांच्या मतांवर सत्तेत आलेले हे सरकार त्यांच्याच जीवावर उठले आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार येणार असून, शिवसेना विरोधी पक्ष राहील तर, भाजपचा सुपडासाप होणार असल्याचे मत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मालेगाव येथील जाहीर सभेत व्यक्त केले.
काँग्रेसची महापर्दाफाश यात्रा वाशिम जिल्ह्यात आली असता, घेण्यात आलेल्या सभेत नाना पटोले बोलत होते. यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी एसटी विमा सुरू केला असून रोज 67 लाख रुपये मातोश्रीवर असल्याच्या संदर्भात मी बोलल्यावर माझ्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्यामुळे हे सरकार यापुढे सत्तेत आले तर गरिबांची जीवन वाहिनी असलेली लालपरी बंद करणार असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
इतर पक्षाच्या नेत्यांवर ईडीची चौकशी लावली जात आहे. मात्र, मुख्यमंत्री यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना फायदा व्हावा म्हणून बँकेचा चुकीच्या पध्दतीने वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गुन्हा दाखल आहे. मात्र, त्यांची चौकशी होत नाही. तर, त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.