वाशिम- विविध मागण्यांसाठी वाशिम जिल्हा टेंट अँड डेकोरेशन असोसिएशन आणि विवाह सेवा संघर्ष समितीच्या वतीने आज वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. कोरोनामुळे लग्न समारंभाला परवानगी नसल्याने टेंट डेकोरेशन व्यवसाय ठप्प झाला आहे. या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले.
वाशिम जिल्ह्यात आठ हजाराहून अधिक नोंदणीकृत व्यवसायिक असून, त्यांच्याकडे किमान नव्वद हजार कामगार आहेत. मात्र कोरोनामुळे काम गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने लग्नसमारभांसाठी 500 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. या मुख्य मागणीसोबतच, व्यावसायावरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्के करावा. कर्जावर सबसीडी द्यावी, कर्जाचे हप्ते वसुलीला जोपर्यंत व्यावसाय पूर्ण क्षमतेने सुरू होत नाहीत तोपर्यंत स्थगिती द्यावी. अशा विविध मागण्या करण्यात आल्या.यावेळी आंदोलनकर्त्यांनी काळ्या फिती लावून निषेध केला.