वाशिम - आधीच अडचणीत असलेल्या शेतकर्यांवर पुन्हा मोठे संकट आले आहे. जिल्ह्यात काल सायंकाळी झालेल्या अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्यात काल परतीचा पाऊस सर्वदूर झाला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शंभर हेक्टर शेतात काढून ठेवलेले सोयाबीन पीक भिजले आहे.
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात पांगरी नवघरे येथे शेतात जाण्यासाठी रस्ते नाहीत. शेतकऱ्यांनी अनेकवेळा शेत रस्त्यासाठी मागणी करूनही त्यांची मागणी पूर्ण झाली नाही. रस्ता नसल्यामुळे सोयाबीन काढणारी मशीन शेतात नेता आले नाही. त्यामुळे शेतात झाकून ठेवलेल्या सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
असाच पाऊस सुरू राहिला तर, शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनला कोंब येऊन पुन्हा सोयाबीन पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कृषी विभागाने सर्व्हे करून मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.